मुंबई: राज्यात आणि केंद्रात युपीए सरकार असल्यामुळेच मालेगाव ब्लास्ट प्रकरणात (Malegaon Blast Case Update) आपल्याला गोवण्यात आलं, अतिशय पद्धतशीरपणे 'हिंदू दहशतवाद' असा प्रचार करण्यात आला असा खळबळजनक आरोप मालेगाव ब्लास्ट 2008 च्या खटल्यातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (Lt Col Prasad Purohit) यांनी एनआयए कोर्टात (NIA Court) केला.


कथित दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचं मान्य करण्यासाठी एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांचा दबाव होता. तसेच सहआयुक्त परमबीर सिंह यांनी मारहाण आणि छळ करून आपल्याला आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर आरोप करायला लावले असं पुरोहित यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात दिलेल्या 23 पानी लेखी जबाब म्हटलंय.


शरद पवारांनी ऑगस्ट 2008 मध्ये एनसीपीच्या अलिबाग रॅलीत पहिल्यांदा 'हिंदू दहशतवाद' असा उल्लेख केला, त्यानंतर हा शब्द प्रचलित झाला असा पुरोहित यांनी दावा केलाय. करकरेंच्या माध्यमातून एटीएसनं राजकीय दबावापोटी खोटी केस दाखल केल्याचा पुरोहितांचा आरोप आहे. तपासयंत्रणा आपल्या मूळ कामकाजाचा ठाव घेण्यात आणि ते समजून घेण्यात अपयशी ठरल्याचाही पुरोहितांचा आरोप आहे. याच प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी हा आर्मीचा अधिकृत खबरी असूनही त्याच्या माध्यमातून आपल्याला यात गोवल्याचा पुरोहितांचा दावाय. 


काय आहे प्रकरण -


29 सप्टेंबर 2008 रोजी उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथील एका मशिदीजवळ मोटर सायकलचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि 100 हून अधिक जखमी झाले होते. 


सुरुवातीला या प्रकरणाचा तपास राज्य दहशतवादविरोधी पथकानं (एटीएस) केल्यानंतर साल 2011 मध्ये एनआयएकडे हा तपास हस्तांतरित करण्यात आला. 


एनआयएनं साल 2016 मध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, श्याम साहू, प्रवीण टाकल्की आणि शिवनारायण कालसांग्रा आरोपींविरोधात मकोक्का अंतर्गत कोणतेही पुरावे नसल्याचं मान्य केलं. 


साल 2017 मध्ये न्यायालयानं, प्रज्ञासिंह ठाकूर यांनाही आरोपांतून वगळूत साहू, कलसांग्रा आणि टाकल्की यांना दोषमुक्त केलं. यामध्ये पुढे राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे यांचीही या खटल्यातून मुक्तता केली गेली. 


30 ऑक्टोबर 2018 रोजी विशेष न्यायालयानं सात आरोपींविरुद्ध युएपीए आणि भदंविच्या कठोर कलमांतर्गत आरोप निश्चित केले. यामध्ये कर्नल पुरोहित आणि प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचा आरोपी म्हणून समावेश आहे.


आरोपनिश्चित केल्यानंतर, खटल्यातील पहिल्या साक्षीदाराच्या तपासणीसह साल 2018 मध्ये हा खटला सुरू झाला होता.


कोर्टाला दिलेल्या या जाबाबत पुरोहितांनी दाऊद इब्राहिम, आयएसआय आणि डॉ. झाकीर नाईक यांच्या आयआरएफ बाबतही गुप्तवार्ता यंत्रणेला वेळोवेळी पुरवल्याचा दावा केलाय.


पुरोहितांचे अन्य दावे - 


दाऊद इब्राहिम आणि कम्युनिस्टवादी नेता डॉ. गणपतीच्या भेटीतून महाराष्ट्रातील नक्षली कारवायांची माहिती आपण यंत्रणेला दिली होती.


नेपाळमधून शत्र, ड्रग्ज यांचा पुरवठा बंद झाल्यानंतर दंडकारण्यातून नक्षलवाद्यांना पुरवठा सुरू झाल्याची माहिती दिली होती.


महाराष्ट्रातील ठाणे, पालघर आणि मध्य प्रदेश सीमेपर्यंत शस्त्र आणि स्फोटकांचा पुरवठा होत असल्याचं सांगितलं होत.


याशिवाय साल 2006-07 मध्ये डॉ. झाकिर नाईकनं ईस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून बनावट नोटा आणि आयएसआयकडून दहशतवादी कृत्यांना पाठबळ दिलं जात असल्याचाही अहवाल दिला होता.


गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला मालेगाव ब्लास्ट खटला आता हळूहळू अंतिम टप्यात येऊ लागलाय. राज्यात आणि देशात बदलेली राजकीय परिस्थिती याचा परिणाम या खटल्यादरम्यान पाहायला आणि अनुभवायलाही मिळालाय. त्यामुळे निकाली लागेपर्यंत या खटल्यातून आणखीन काय काय पाहायला मिळणाराय याचं उत्तर काळच देईल.


ही बातमी वाचा :