Chinese Nylon String : नाशिकमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशीच मांजाने एका दुचाकी स्वाराचा गळा चिरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक पोलिसांकडून नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्या विरोधात धडक करवाई केली जात असतानाच नागरिकांकडून ठिक ठिकाणी पोलिसांनाच मज्जाव केला जात आहे. आपल्या पाल्यांना नायलॉन मांजा पासून दूर ठेवण्याची जबाबदारी नागरिकांनी बजावणे अपेक्षित असताना पोलिसांच्या कामात अडथळा आणला जात असल्याचं दृश्य शहरात बघायला मिळाले.
नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात राहणारा 23 वर्षीय सोनू किसन धोत्रे गुजरात मधील महापालिकेत चालकाची नोकरी करत होता. संक्रांती निमित्ताने गुजरातहून नाशिकला निघाला होता. शकडो किलोमीटरचा प्रवास पार करून सोनू नाशिकध्ये पोहोचला. त्याचे घर अवघे 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर असताना मांजाने गळा चिरून त्याचा जीव गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोनूला स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांच्या आक्रोशाने संपूर्ण जिल्हा रुग्णालय परिसर हेलावून गेला.
येवला तालुक्यात 5 वर्षीय चिमुकल्याच्या नायलॉन मांजामुळे इजा होऊन 14 टाके पडले. तर पिंपळखुटे येथील शुभम पवार यांना देखील गळ्याला नायलॉन मांजामुळे इजा होवून 20 टाके पडले आहेत.
मांजामुळे हिंगोलीत तीन जणांच्या मान कापल्या
मकर संक्रांतीनिमित्त युवकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये पतंगबाजी केली जाते. ही पतंगबाजी केली जात असताना बंदी असलेल्या चायनीज मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या चायनीज मांजामुळे हिंगोलीमध्ये वेगवेगळ्या घटनेमध्ये तीन जणांची मान कापली गेली. यामध्ये दोन जणांची प्रकृती गंभीर असून एक जणाला किरकोळ दुखापत झाली आहे. शेख शेरू शेख दिवाण यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून यांना 22 टाके पडले आहेत. त्यांची तब्येत स्थिर आहे
दुसऱ्या घटनेमध्ये राहुल कांबळे यांना सुद्धा मानेला दुखापत झाली असून त्यांच्या मानेला 6 टाके पडले आहेत. तर अन्य एक जणाला मानेला किरकोळ दुखापत झाली आहे.
जळगावमध्ये मांजामुळे तरुणाचा गळा कापला
जळगाव शहरातील कानळदा शंभर फुटी रोडवर नायलॉन मांजामुळे दुचाकीवरून घरी जात असताना छत्रपती शिवाजी महाराजनगर मधील रहिवाशी विकी नारायण तरटे या तरुणाचा गळा कापला गेल्याची घटना घडली आहे. कामावरून परतताना ही दुर्घटना घडली. जखमी अवस्थेतही त्यांनी तातडीने स्वतः रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले.
वेळीच उपचार करण्यात आल्याने अनर्थ टळला असला तरी पतंगासाठी वापरण्यात येत असलेल्या या नायलॉन मांजाचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन केले आहे. नायलॉन मांजा वापरण्यावर बंदी असतानाही काही जण अशा प्रकारे पतंगबाजीसाठी नायलॉन मांजा वापरतात. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
प्रशासनाकडून कारवाई
मकर संक्रांत निमित्त सर्वांनाच वेध लागतात ते पतंग उडवण्याचे. पण हा आनंद घेत असताना पतंगासाठी वापरला जाणारा चायनीज नायलॉनचा मांजा हा कित्येकांच्या जीवावर उठणारा ठरला आहे. नायलॉन मांजामुळे असंख्य नागरिकांचे गळे चिरले जात आहेत. तर आकाशात स्वच्छंद विहार करणाऱ्या पक्षांना सुद्धा त्यामुळे बऱ्याच वेळा जायबंदी व्हावे लागते. त्यामुळे नायलॉन मांजावर पोलिस आणि प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे.