औरंगाबाद : ऐन दिवाळीला औरंगाबादमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं. जिल्हा परिषदेच्या मैदानातील फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या भीषण आगीत मार्केट बेचिराख झालं आहे. या मैदानातील सुमारे 142 स्टॉल्स खाक झाले आहेत.

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीने आग आटोक्यात आणली आहे. सध्या कूलिंग ऑपरेशन सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. औरंगाबादमध्ये एवढी मोठ्या प्रमाणात आग लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आगीत मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. सुदैवाने आगीत जीवितहानी झालेली नाही.

काय घडलं नेमकं?
औरंगाबादमधील जिल्हा परिषद मैदानात दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचं बाजार भरतो. यंदाही मैदानात फटाक्यांचे सुमारे 200 स्टॉल्स लागले होते. मात्र आज सकाळी 11.30 च्या सुमारास स्टॉल क्रमांक 49 आणि 50 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. परंतु दुकानं लागूनच असल्याने क्षणार्धात आग पसरली आणि सगळी दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

चारचाकी, दुचाकी, रिक्षा खाक
औरंगपुरा हा जिल्ह्यातील मध्यवर्ती भाग आहे. उद्या लक्ष्मीपूजन असल्याने औरंगाबादकर खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. फटाक्यांच्या खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या मैदानात नागरिकांची गर्दी होती. मात्र अचानक लागलेल्या आगीत दुकानांसह 25 ते 30 चारचाकी, अनेक दुचाकी आणि रिक्षा जळून खाक झाल्या आहेत.

चूक नेमकी कोणाची?
फटाके स्टॉलधारकांनी अग्निशमनच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दुकानदारांकडे अग्निशमन दलाची परवानगी होती का, परवानगी देताना दुकानदारांकडे आग विझवण्याची सुविधा होत्या का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांच्या चुकीमुळे आग लागल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं लोकप्रतिनीधींनी जाहीर केलं आहे.

तर मागणी करुनही अग्निशमन दलाची यंत्रणा मिळाली नाही, असा दावा दुकानदारांनी केला आहे. या घटनेला महापालिका जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नुकसान झालेल्यांना भरपाई देणार : खैरे
दरम्यान, फटाक्यांच्या आगीत नुकसान झालेल्यांना भरपाई देणार असल्याची माहिती औरंगाबादमधील शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. तसंच या घटनेची चौकशी करावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण
या मैदानाच्या शेजारी रहिवासी इमारती असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागरिकांनी भीतीमुळे तिथून पळ काढला. आगीनंतर परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहे.

पाहा व्हिडीओ