बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-मेहकर रोडवरील हिवरा आश्रमाजवळ देवदर्शनावरुन परतताना भाविकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात 3 भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून गाडीचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
अपघातग्रस्त सर्व भाविक हे नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील रहिवासी असून एकाच कुटुंबातील आहेत. मृतांमध्ये एका लहान बाळाच्या आईचा समावेश असून, अवघ्या 4 महिन्यांचे बाळ मात्र सुदैवाने वाचलं आहे.
दर्शन आटोपून ते चिखली-मेहेकर मार्गे नांदेडला जाण्यासाठी निघाले असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि हिवरा आश्रमाजवळ त्यांच्या गाडीने 3 ते 4 पलट्या मारल्या. अपघातग्रस्त भाविक हे बुलडाण्यातील जाईचा देव येथे दर्शनासाठी आले होते.