मुंबई : कोरोना या विषाणूपेक्षा जास्त वेगानं पसरणारी काही गोष्ट असेल तर ती म्हणजे कोरोनाच्या नावावर खपणारी अफवा मिसइन्फर्मेशन थोडक्यात फेक न्यूज. या अफवांनी मात्र महाराष्ट्रात कोंबडी उद्योगाचा शब्दश: बाजार उठवलाय. कोंबड्यांना कोरोनानं ग्रासलंय आणि त्या खाल्ल्यानं माणसालाही कोरोना होतो, अशा तद्दन खोट्या माहितीनं, फेक व्हिडिओद्वारे कोंबड्यांबाबत भीती पसरवली गेली आहे. परिणामी, आज महाराष्ट्रात दीड कोटीच्या सुमारास कोंबड्या पडून असून गेल्या 7 दिवसात 600 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कोंबडी उद्योग म्हणजे शेतक-याच्या घरचं एटीएमच जणू. शेतीला पूरक असा हा उद्योग. ग्रामीण तरूणाईसाठीचा हक्काचा व्यवसाय. मात्र, या कोरोनाच्या अफवांनी शेतकरी किंवा पोल्ट्रीकडून कोंबड्या विकत घेतल्या जात नाही. खाटिकाकडेही इतरवेळी 150 रू. किलोनं जाणारी कोंबडी 20, 30 रु. किलोनंही कुणी घेत नाही. म्हणूनच, हे असं कसं झालं? यामागे अन्य राज्यातील पोल्ट्री उद्योगाची लॉबी किंवा बहुराष्ट्रीय अन्न उद्योगातील कंपन्या आहेत का? मुळात कोंबड्यांना आणि त्या खाल्ल्यावर माणसांना कोरोना होईल का? यावरच आज 'माझा विशेष'मध्ये चर्चा झाली.
चर्चेच्या सुरूवातीला उस्मानाबादमधले कुक्कुटपालन व्यावसायिक महिपती जाधव म्हणाले की, त्यांच्यासमोर आता उरलेल्या कोंबड्यांचं काय करायचं हा प्रश्न आहे. एक कोंबडीचं पिलू मोठं होऊन विकेपर्यंत त्याच्यावर 180 रु. खर्च होतो. या हिशोबानं शेकडो कोंबड्यांना पोसावं लागतं. आता कोंबड्याच कुणी घेईना म्हटल्यावर आहे त्या कोंबड्यांच्या खाद्यासाठी पैसा कुठून आणायचा हाच प्रश्न आहे. आता शासनानंच यात हस्तक्षेप करून 'चिकन महोत्सव' वगैरे कार्यक्रम आयोजित करून लोकांचं प्रबोधन करावं. जाधव यांच्यासोबत आलेले चिकन विक्रेते सय्यद मुजम्मिल यांनी भारतीय लोकांच्या खाद्यसवयीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, चीनी लोक असंख्य प्रकारचे प्राणी, किटक, पक्षी खातात. आपल्याकडे मात्र निवडक प्राण्यांचेच मास तेही मसाले वापरून आणि शिजवून खाल्ले जाते. त्यामुळे कोंबडी खाल्ल्यानं कोरोना होतो, अशा अफवेत अर्थ नाही. "आधीच कमी दरात आम्ही चिकन विक्रीला ठेवलं तर लोकांना खरंच वाटेल की कोरोना वगैरे भानगड आहे. म्हणूनच आम्ही 120 रु. किलोची जाहिरात करतो. मात्र नंतर 60, 70 रुपये किलोने विकतो", असंही सय्यदभाई म्हणाले.
Vishesh Majha | कोरोनाची दाखवून भीती पोल्ट्रीवाल्यांची कुणामुळे माती?
नाशिकहून आनंद एग्रोचे संचालक उद्धव अहिरे यांनी राज्यातल्या कोंबडीपालन उद्योगाची सद्यपरिस्थिती आकडेवारीसह मांडली. त्यातून होणारं रोजचं नुकसान पाहता शासनानं यात पोल्ट्री व्यावसायिकांची मदत करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यवसायाला मात देण्यासाठी परराज्यातील व्यावसायिकही या अफवांचे प्रकार करत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. खासकरून, भारतीयांना आवडणारे लेग पीस रेडिमेड देणाऱ्या अमेरिकी कंपन्यांना हे मार्केट काबीज करायचं असल्यानं, त्यांच्याकडूनही या अफवांचे उद्योग केले जाऊ शकतात, अशी भीतीही अहिरे यांनी व्यक्त केली. त्यांच्यासोबत असलेले पशुवैद्यक तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर परदेशी यांनी कोंबड्यांमधून कोरोना पसरण्याच्या शक्यतेला फेटाळून लावत म्हटले की, मुळात सध्या माणसातून माणसांमध्ये हा आजार पसरतोय. भारतात यापूर्वी कधीही कोणत्याही विषाणूंचा कोंबड्या, शेळ्यांना संसर्ग झालेला नाही. या केवळ अफवा उठवल्या गेल्या आहेत ज्यावर कुणीही विश्वास ठेवू नये.
पुण्याहून चर्चेत सहभागी झालेले इंडियन मेडिकल असो.चे प्रदेशाध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले की, आपल्याकडे 100 डिग्रीपेक्षा जास्त तापमानात मांस शिजवले, तळले, भाजले जाते. यामुळे कोणताही विषाणू अशा तापमानात टिकत नाही. कोंबड्यापासून कोरोना होण्याच्या काळजीऐवजी लोकांनी हात धुणे, गर्दीत न जाणे, व्यक्तिगत स्वच्छता यांची काळजी घ्यावी.
संबंधित बातम्या :
Coronvirus Effect | कोरोना व्हायरसच्या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात
Coronavirus |देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, संख्या 43 वर