Majha Maharashtra Majha Vision : राज्यात शहरातला विकास आणि ग्रामीण भागातला विकास यामध्ये मोठी विषमता आढळते. त्यामुळे राज्याचा समान विकास होणं आवश्यक आहे. राज्यातली शेती निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळे ग्रामीण भाग विकासापासून वंचित राहिला. समान विकास व्हायचा असेल तर राज्यातल्या नद्या जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या काळात 'नदी जोडो' प्रकल्पावर भर आणि असमान विकास दूर करण्यासाठी प्रयत्न हेच काँग्रेसचे व्हिजन असणार आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते. 
 
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जगातल्या अनेकांनी सांगितलं की वेगवेगळ्या धर्मांचा हा भारत देश एकसंध राहू शकणार नाही. पण आजही भारत एकसंध राहिला आहे. देशाच्या एकत्रिकरणामध्ये, लोकशाही टिकवण्यामध्ये काँग्रेसची महत्वाची भूमिका असल्याचं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. देशातल्या लोकांना लोकशाहीमध्ये सामिल करण्यामध्ये आणि लोकशाही बळकटीकरणामध्ये काँग्रेसने महत्वाची भूमिका बजावल्याचंही त्यांनी सांगितलं.  


केंद्र सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करतंय
नाना पटोले म्हणाले की, "राज्यात एकाच वर्षी कोकणात वादळ आलं, पूर आला आणि कोरोनाचे संकट आले. या काळात पंतप्रधानांनी इतर राज्यांना भेटी दिल्या पण महाराष्ट्राला कधीही भेट दिली नाही. एनडीआरएफच्या माध्यमातून राज्याला मदत मिळाली नाही. कोरोना काळातही केंद्राने महाराष्ट्राशी दुजाभाव केला. रेमडेसिव्हर असेल किंवा लसी असतील, केंद्राने नेहमीच हात आखडता घेतला. तरीही महाविकास आघाडीने राज्यात चांगलं काम केलं."


बेरोजगारी ही समाजाला लागलेली सर्वात मोठी कीड आहे. त्यामुळे आता शेतीवर आधारित उद्योग उभारण्याची गरज आहे. कृषी संदर्भात केद्र सरकारची चुकीची धोरणं शेतकरी आणि या क्षेत्राच्या विकासाला बाधा आणत असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं. त्यामुळे या क्षेत्राचा विकास करणे अत्यावश्यक असल्याचं ते म्हणाले.


रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणं हे कांग्रेसचं व्हिजन असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. नाना पटोले म्हणाले की, "रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणं ही आताची सर्वात महत्वाची गोष्ट आहे. राजीव गांधींनी कम्पुटर सुरु केलं म्हणून त्याची फळं आज आपण चाखतोय. आजचा भारतीय तरुण जगभरात यशस्वी होतोय. अशीच व्यवस्था येत्या काळात गावागावात उभी करण्याचा संकल्प काँग्रेसचा आहे."


आरोग्य व्यवस्थेच्या विकासावर भर देण्याची गरज असल्याचं सांगत नाना पटोले म्हणाले की, "काँग्रेसने उभारलेली आरोग्यव्यवस्था सध्या तोकडी पडतेय. त्या काळी काँग्रेसने एम्ससारख्या संस्था उभारल्या, गावागावात प्राथमिक आरोग्य केंद्रं उभारली. पण आताच्या काळात त्यामध्ये अजून विकास करण्याची गरज असल्याचं कोरोना काळात प्रकर्षानं जाणवलं. त्यामुळे येत्या काळात राज्यात आरोग्य व्यवस्था ही अजून सक्षम करण्यावर काँग्रेस भर देईल."


संघटनात्मक पातळीवर कमी पडलो
काँग्रेसच्या नेतृत्वावर सातत्याने शंका उपस्थित केली जाते या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, "राजीव गांधींच्या नंतर आम्ही संघटनात्मक पातळीवर कमी पडलो. काँग्रेसकडे कुशल नेतृत्व आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी जीएसटी, नोटबंदी आणि कोरोना काळातील संकटावर आधीच देशाच्या पंतप्रधानांना सावध केलं होतं. पण त्यांची खिल्ली उडवण्यात आली. त्यामुळे काँग्रेसकडे नेतृत्व नाही असं नाही, फक्त गेल्या काही वर्षामध्ये आम्ही संघटनात्मक पातळीवर कमी पडलो."


नाना पटोले पुढे म्हणाले की, "स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने देशात मोठ्या प्रमाणावर विकास केला. पण गेल्या सात वर्षांमध्ये देशाच्या विकासाचा अपप्रचार करण्यात आला, त्याला लोकं बळी पडले आणि त्यामुळेच देशाला चुकीचे नेतृत्व मिळालं. त्याचा परिणाम लोकांना भोगावा लागतोय. आम्ही केलेल्या विकासाचा प्रचार करण्यात कमी पडलो."


दिवसभर दिग्गज नेत्यांकडून महाराष्ट्राचं व्हिजन फक्त एबीपी माझावर
राज्यातील ठाकरे सरकारला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात बरेच बदल देखील नुकतेच झाले आहेत. देशाचा स्वातंत्र्यदिन तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात देशासह राज्यात अनेक समस्या आहेत. राज्याचं बोलायचं झालं तर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, MPSC अशा अनेक मुद्द्यांसह, पूर, कोरोना अशी संकटं अद्याप कायम आहेत. या पार्श्वभूमिवर एबीपी माझातर्फे आज 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 


एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात यानिमित्ताने महाराष्ट्रातील गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामाचा आढावा आणि महाराष्ट्राच्या भविताव्याविषयीचं सरकारच्या धोरणांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री सुभाष देसाई या नेत्यांसह बाबा रामदेव, अभिनेते सचिन पिळगावकर, खेळाडू अंजली भागवत, उद्योजक अरुण फिरोदिया, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या आपलं व्हिजन मांडणार आहेत.  


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी 9 वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डल आणि हॉटस्टारवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.


एबीपी माझा युट्यूब लाईव्ह : https://www.youtube.com/watch?v=I6zGBF72o7M 
फेसबुक पेज : https://www.facebook.com/abpmajha 
ट्विटर हँडल : https://twitter.com/abpmajhatv 


संबंधित बातम्या :