मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आजपर्यंत मंत्रालय कुठे होते हे माहित नव्हते या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर बोलतांना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की, 'चंद्रकांत पाटील हे मागच्या दरवाजाने मंत्रालयात आले आणि आमदार झाले', अशी टीका पाटील यांनी केली. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते.


गुलाबराव पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र आहे. त्यांना मंत्रालय पाहण्याची गरजचं नाही कारण त्यांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना घडवलं आणि मंत्रालयात पाठवलं. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी मंत्रालय पाहणे गरजेचे आहे कारण त्यांनी कधी मंत्रालय पाहिलेचं नाही ते मागच्या दाराने आले आणि आमदार झाले. हे खालच्या पातळीचं वक्त्व्य चंद्रकांतदादांसारख्या श्रेष्ठ नेत्यांकडून अपेक्षित नाही.


कोण आहे कंगना?


अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालय तोडफोडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला झटका दिला. तसेच महापालिकेद्वारे पाठवलेली नोटीसही हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. याविषयी विचारले असता पाटील म्हणाले,
"कोण आहे ही कंगना ? कंगनापेक्षा शेतात राबणाऱ्या आमच्या माऊलीला प्रसिद्धी द्यायला हवी.. कंगना म्हणजे चित्रपटांमध्ये फोटे काढून पैसे कमवणारी महिला आहे. त्यामुळे तीला काय एवढा भाव द्यायचा".


पलटूराम हे भाजप सरकार 


महाविकास आघाडी सरकार पलटूराम सरकार आहे असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी स्वत: पलटी मारली. त्यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे हे महाविकासआघाडीचे सरकार आले आहे.   त्यामुळे हे पलटूराम ते स्वत: आहेत. दानवेजी डमरू आहे.  कार्यकर्त्यांना जागृत ठेवण्यासाठी टीका करणे विरोधकांचं काम आहे.