Praful Patel On Majha Katta: केंद्रातील देवेगौडा सरकार पडलं त्यावेळी सर्व विरोधी पक्षांनी पंतप्रधानपदासाठी शरद पवारांनी पाठिंबा दिला होता, खुद्द देवेगौडा यांनीही पाठिंबा दिला होता, पण आमचं त्यावेळी गणित चुकलं आणि शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत असं राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. त्यावेळी शरद पवारांनी जर अजून ठाम भूमिका घेतली असती तर ते पंतप्रधान झाले असते असं ते म्हणाले. प्रफुल्ल पटेल हे एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते.
शरद पवारांना पंतप्रधानपदाने हुलकावणी कशी दिली याची आठवण सांगताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, "काँग्रेसचे नेते नरसिंह राव यांना शरद पवारांना पुढे येऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे काँग्रेसचे 145 खासदार असतानादेखील त्यांनी देवेगौडा यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला. पण त्यानंतर सिताराम केसरी यांना पंतप्रधान व्हायचं होतं म्हणून त्यांनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढून घेतला. शरद पवार त्यावेळी काँग्रेसचे संसदीय नेते होते. त्यानंतर सर्वच खासदारांनी शरद पवारांना पाठिंबा दिला. खुद्द देवेगौडा यांनीही शरद पवारांनी नेतृत्व स्वीकारावं आणि पंतप्रधान बनावं अशी इच्छा व्यक्त केली. पण शरद पवारांनी त्यावेळी ठाम भूमिका घेतली नाही, आमचं गणित चुकलं आणि इंद्रकुमार गुजराल हे पंतप्रधान झाले."
शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा निर्णय हा अचानकपणे घेतला होता, त्याची माहिती आपल्याला नव्हती असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. ते म्हणाले की, "शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आम्हाला काही सुचलं नाही. त्यानंतर आम्ही त्यांना राजीनामा मागे घ्यायला लावला. पण शरद पवारांना नवीन लोकांना संधी द्यायची होती. त्यामुळे हा निर्णय घेतला होता. पण नंतर मग दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला."
सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करा हे मीच सांगितलं होतं....
पाच वर्षापूर्वी ज्यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची नियुक्ती करण्याची वेळ आली त्यावेळी सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करावं असं मीच सुचवलं होतं असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "सुप्रिया सुळे यांनी खासदार म्हणून चांगलं काम केलं होतं. त्यामुळे त्यांना संधी देण्यात यावी अशा मताचा मी होतो. पण सुप्रिया सुळे यांनीच त्याला नकार दिला."
अजितदादा नाराज नाहीत...
राष्ट्रवादीत दोन कार्यकारी अध्यक्ष नेमल्यानंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती, यावर प्रतिक्रिया देताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित पवार नाराज वगैरे काही नाहीत. ते राज्यात चांगलं काम करत आहेत. या फक्त अफवा आहेत.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडीमध्ये तणाव
2014 सालच्या आधी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यावेळी दोन्ही पक्षांमध्ये तणाव होता असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीबद्दलच्या अनेक चुकीच्या बातम्या बाहेर येत होत्या. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर 2014 साली आम्ही वेगळं लढलो. जर एकत्रित लढलो असतो तर आज परिस्थिती वेगळी असती."