नाशिक: नाशिकमधील मैत्रेय चिटफंडमध्ये गुंतवलेले पैसे गुंतवणूकदारांना परत मिळणार आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने काल तसा आदेश दिला आहे.


 

चिटफंड घोटाळ्यातील पैसे गुंतवणूकदारांना परत मिळण्याची ही देशातील पहिलीच वेळ असेल.

 

गुंतवणूकदारांच्या बँक अकाऊंटमध्ये रक्कम

 

पैसे वाटप प्रक्रियेसाठी समितीची स्थापना केली जाणार आहे. हे पैसे थेट गुंतवणूकदारांच्या  खात्यात जमा होणार आहेत.

 

सहा महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये जवळपास तेराशे कोटींचा मैत्रेय नामक घोटाळा उघडकीस आला होता, ज्यात नाशिकमधून चौदा हजार ठेवीदारांनी तक्रारी दिल्या होत्या. त्याचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

पैसे वाटपासाठी समिती


पैसे वाटप प्रक्रियेसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या कमिटीत महसूल विभागातील एक, मैत्रेयमधून एक, ठेवीदारातील एक आणि पोलिसांतील एक असे सदस्य असतील.

 

गुंतवणूकदारांच्या अकाऊंटमध्ये रक्कम जमा होणार आहेत. यामध्ये एस्क्रो अकाऊंटची भूमिका ही महत्वाची ठरली आहे. पोलिसांच्या विनंतीनुसार हे अकाऊंट बनविण्यात आले असून, सध्या मैत्रेयचे 6 कोटी 42 लाख रुपये एस्क्रो अकाऊंट मध्ये जमा आहेत.

 

देशातील पहिलीच घटना


दरम्यान, 6 महिन्यात तक्रारी दाखल होऊन त्याचा तपास, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार असल्याचा दुर्मिळ आणि महत्वपूर्ण असा हा खटला मानला जात आहे.

 

हा ऐतिहासिक निकाल असून भारतातील अशी पहिलीच घटना असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं आहे. तर ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं आहे.