मुंबई : भाजपची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असली, तरी यामध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवार नसल्याने महाराष्ट्रातील महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा हा अत्यंत गुंतागुंतीचा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत महायुतीकडून कोणत्याच उमेदवारांवर शिकामोर्तब झालेलं नाही. महायुतीमधील चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौरा करत जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाशी चर्चा केली. मात्र, अंतिम जागा वाटप दिल्लीमधूनच होणार आहे. त्यामुळे भाजपच्या वाटेला जागा किती येणार? शिंदे गटाला किती मिळणार? अजित पवार किती मिळणार? याचं उत्तर मात्र अनुत्तरीत आहे. 


दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये 48 पैकी सर्वाधिक जागा भाजपच लढणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार यांच्या वाटेला 10 पेक्षा कमी जागा देण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील अधिकाधिक जागांवर भाजप उमेदवार रिंगणात असतील. त्यामुळे पवार शिंदे गटाला सिंगल डिजिट अर्थात एक आकडी जागा मिळतील, असं बोललं जात आहे. दुसरीकडे, जागा वाटपासाठी बैठकांवर बैठका सुरू असल्या तरी अंतिम निर्णय हा दिल्लीमधूनच होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासह राज्यातील भाजपचे नेते बैठकीसाठी दिल्लील रवाना झाले आहेत. अजित पवार किमान 9 जागा आणि शिंदे विद्यमान 13 खासदारांसाठी आग्रही आहेत. मात्र, भाजपकडून दोघांना मिळून 10च्या आत जागा देण्यावर 'विचार' करत असल्याचे स्पष्ट आहे. 


आज दिवसभर महायुतीच्या बैठक असा होता क्रम



  • सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी 9.45 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल

  • त्यानंतर 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीवर दाखल झाले

  • 10.15 मिनिटांनी सह्याद्री अतिथीगृहावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे येथील मेट्रो उद्धटनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री चंद्रकांत पाटील, उपस्थित होते. 

  • भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 10.45 ला सह्याद्रीवर दाखल झाले 

  • यानंतर अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या सर्व नेत्यांची जागा वाटपावर चर्चा. या बैठकीत काही जागांवर चर्चा झाली

  • बैठक संपल्यावर 11.20 मिनिटांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गाडीतून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बांद्रा बिकेसी येथील कार्यक्रम साठी रवाना झाले 

  • अमित शाह याचे भाषण संपल्यावर बिकेसी जिओ वर्ल्ड सेंटर येथे सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अमित शहा यांनी बंद दाराआड चर्चा केली

  • त्यानंतर 1.25 मिनिटांनी केंद्रीय गृहमंत्री यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याच्या सोबत राष्ट्रवादीच्या जागाबाबत बैठक पार पडली 

  • 1.35 मिनिटांनी केंद्रीय गृहमंत्री तसेच सर्व नेते बाहेर पडले

  • त्यानंतर अमित शहा दिल्लीला रवाना झाले

  • दिल्लीत भाजप कोअर कमिटी बैठक असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर हे देखील दिल्लीसाठी रवाना झाले.