Mahashivratri 2022 Jyotirlinga Yatra : हिंगोली जिल्ह्यातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ येथील महाशिवरात्री यात्रा कोरोनाच्या अनुषंगाने सलग तिसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश दिले आहेत. मात्र, या काळात भाविकांना दर्शनासाठी मंदिर उघडे असणार असल्याचे संस्थानाच्यावतीने सांगण्यात आले आहे. 


मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे महाशिवरात्री यात्रेवर मोठे निर्बंध होते. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असताना ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये तसेच व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसतोय. तसेच, सलग तीन वर्ष यात्रा रद्द झाल्यामुळे व्यावसायिकांच्या व्यवसायावरदेखील मोठा परिणाम झाला आहे. 


दरवर्षी 26 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत भरणाऱ्या या यात्रेमध्ये प्रचंड प्रमाणात भाविकांचा उत्साह पाहायला मिळतो. यावेळी गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक इत्यादी राज्यांतून भाविक मोठ्या प्रमाणात नागनाथाच्या दर्शनासाठी येतात. परंतु, यावर्षी मात्र हा उत्साह पाहायला मिळणार नाही. 



भारतातील 12 ज्योतिर्लिंगांची नावे :


1. सोमनाथ (गुजरात -गीर सोमनाथ जिल्हा/वेरावळ)
2. मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)
3. महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)
4. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर,खंडवा जिल्हा)
5. वैजनाथ (महाराष्ट्र - परळी, बीड जिल्हा)
6. भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर,खेड तालुका, पुणे जिल्हा)
7. रामेश्वर (तामिळनाडू - रामेश्वर,रामनाथपुरम जिल्हा)
8. नागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ,हिंगोली जिल्हा)
9. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)
10. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा)
11. केदारनाथ (उत्तराखंड - केदारनाथ,रुद्रप्रयाग जिल्हा)
12. घृष्णेश्वर (महाराष्ट्र -वेरुळ,खुल्ताबाद तालुका, औरंगाबाद जिल्हा).


महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांची नावे :


1. परळी वैजनाथ


2. भीमाशंकर


3. त्र्यंबकेश्वर


4. घृष्णेश्वर


5. औंढा नागनाथ


पाचवे ज्योतिर्लिंग परळीचे वैजनाथ देवस्थानाकडूनही येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त मोठे तयारी सध्या सुरू आहे. प्रशासनाकडून यात्रोत्सवाला परवानगी देण्यात आली नसली तरी मंदिर प्रशासन आणि एकूण भाविक मात्र येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त मोठी तयारी करताना पाहायला मिळत आहेत. मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे महाशिवरात्री उत्सव साजरा करता आला नव्हता. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक महाशिवरात्रीची तयारी करताना पाहायला मिळतायत. 


कोकणातील भराडी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरा 


गेल्या वर्षी कोरोनामुळे कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा मर्यादित स्वरुपात आणि साधेपणाने साजरी करण्यात आली होती. मात्र, यंदा मोठ्या उत्साहात कोरोनाचे नियम पाळून आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा 24 फेब्रुवारी रोजी साजरी झाली. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha