Maharashtra Winter Session:  विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Winter Session) शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) चांगलीच आक्रमक झाली असल्याचे चित्र आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर एनआयटी भूखंड विक्री प्रकरणी आरोप केल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची मालिका सुरू झाल्याचे चित्र आहे. अब्दुल सत्तार (Abdul Sattar), संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यानंतर आता शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) अडचणीत येण्याची शक्यता आहे. शंभूराज देसाई यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. 


राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. आता, ठाकरे गटाने त्यांनाच लक्ष्य केले आहे. राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात सदर जागेवर घराचे बांधकाम असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, मात्र सातबारा उताऱ्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही. कोणतीही परवानगी न घेता घराचे अवैध बांधकाम केल्याचा आरोप ठाकरे गटाने शंभूराज देसाई यांच्यावर केला आहे. महाबळेश्वर जवळील नावली येथील गट क्रमांक-24 मधील शेत जमिनीवर अवैध बांधकाम केले असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. 


निवडणूक शपथपत्रात या जमिनीचा शेतजमीन म्हणून उल्लेख आहे, परंतु प्रत्यक्षात या जमिनीवर निवासी बांधकाम केलेले आहे. सदरील जमीन ही इकोसेन्सेटिव्ह झोन मध्ये येत असल्यामुळे बांधकामास परवानगी नाही, ही बाब ठाकरे गटाने समोर आणली आहे. विशेष म्हणजे ही जमीन ही स्वतः शंभूराजे देसाई यांच्या नावावर आहे. स्वतः लोकप्रतिनिधी असल्याने त्यांनीच अतिक्रमण तथा अवैध बांधकाम केल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. 


संजय राठोडांवर आरोप काय?


संजय राठोड यांनी 2019 मध्ये 5 एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढले. गायरान जमिनीवरील अतिक्रमण हे नियमानुकूल करण्याची तरतूद नाही. कोर्टानेदेखील याबाबतचे आदेश वेळोवेळी दिले आहेत. संबंधित 5 एकर जागा नियमानुकूल करण्याचे आदेश तत्कालीन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी 2018 मध्ये दिलेला आदेश संजय राठोड यांनी रद्द केला. 


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी एनआयटी भूखंड विक्रीत घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यानंतर गायरान जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी आणि सिल्लोड कृषी महोत्सवाच्या मुद्यावर सोमवारी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले होते. त्यांनी कृषी मंत्री सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला होता. त्यानंतर सभागृहात आज संजय राठोड, शंभूराज देसाई यांच्या मुद्यावर सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: