Weather Update:मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा पोषक वातावरण तयार झाल्याने ढगाळ हवामानासह आर्द्रता वाढली होती. किमान तापमानात वाढ झाल्याने नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते. आता राज्यात पुन्हा तापमान घटू लागलं आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानातील चढउतार सुरुच आहे. हवामान विभागानं सांगितलेल्या अंदाजानुसार राज्यातील तापमान आता अजून कमी होणार आहे. येत्या 24 तासांत विदर्भ, मराठवाडा सध्या किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा इशारा देण्यात आलाय.कोरडे व थंड प्रवाह सक्रीय राहिल्यानं गारठा कायम राहणार आहे. (IMD forecast)
सध्या दक्षिणेत नव्याने चक्राकार वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट कायम असल्याने राज्याच्या दिशेने कोरडे व थंड वारे वाहू लागलेत. याचा परिणाम म्हणून तापमानात काही अंशांची घट झाली आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात मध्य व उत्तर भागात तापमानात काही अंशांनी घट झाली होती. नाशिक, निफाड भागात तर किमान तापमानाचा पारा ६ अंशांपर्यंत गेल्याची नोंद झाली. राज्यात बहुतांश भागात 10 अंशांहून खाली तापमान जाऊ लागलं आहे. परंतू आता आजपासून महाराष्ट्रात किमान तापमानात 1-5 अंशांची वाढ होणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात हळूहळू किमान तापमान वाढणार असून 2-4 अंशांनी तापमाना वाढल्याने उन्हाचा तडाखा आणि उकाड्यासह पहाटे गारवा, काही भागात धुक्याची चादर राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. उत्तर भारताकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे तीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याचे पाहायला मिळाले. वातावरणात झालेल्या बदलामुळे सर्वसामान्यांना हुडहुडी भरली. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्यांभोवती गर्दी झालेली दिसून आली. किमान तापमानात काहीशी वाढ झाली होऊनही हवेतील गारठा कायम आहे. पुढील काही दिवस थंडीचा जोर कमी राहील, असा अंदाज आहे.
मुंबईकरांना तापमानात दिलासा
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पहाटे हलका गारवा आणि दुपारी घामाच्या धारांसह प्रचंड उकाड्याला नागरिक सामोरं जातायत. गेल्या आठवड्यात कमाल तापमान 35 अंशांपर्यंत जाऊन ठेपलं होतं. मागील दोन दिवसांपासून पहाटेचा गारवा वाढलाय.त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. आता कमाल आणि किमान तापमानात आजपासून 2-3 अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. मुंबईत 35 अंशांपर्यंत गेलेला कमाल तापमानाचा पारा 28-30 अंशांपर्यंत येण्याची शक्यता आहे. (IMD Weather Update)