Maharashtra weather update: राज्यभरात गेल्या 3 - 4 दिवसांपासून पावसाने धुमाकुळ घातला आहे .कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा ते विदर्भ सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत . बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून हवेतील आर्द्रता वाढली आहे . काढणीला आलेली पिकं पाण्यात भिजत असल्याने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा नुकसान होत आहे . दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे .आज मुंबई पुण्यासह बहुतांश महाराष्ट्रात पावसाचे अलर्ट आहेत. (Heavy Rain Today)
Weather Update: हवामान विभागाचा अंदाज काय?
मध्यपूर्व अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील तीन ते चार दिवस उत्तर दिशेला सरकणार असून महाराष्ट्रात किनारपट्टी लगतच्या भागासह महाराष्ट्रात काही भागांमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो असा इशारा IMD ने दिलाय . दुसऱ्या बाजूला आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता पुढील दोन दिवसांमध्ये वाढवून त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. 27 ऑक्टोबरला हे चक्रीवादळ तयार झाल्यानंतर ते वायव्य दिशेला सरकून आंध्र प्रदेश, ओडीसा किनारपट्टी जवळ येण्याचा अंदाज आहे. या दोन्ही तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात कोकणापासून ते विदर्भापर्यंत बहुतांश ठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो असं हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे.
थंडीला सुरुवात कधी होणार ?
खरंतर दीपावलीपासून देशभरात हवेत हलका गारवा जाणवू लागतो .मात्र यावर्षी नैऋत्य मॉन्सूनने उशिरा घेतलेली माघार,शक्ती चक्रीवादळामुळे झालेला अवकाळी पाऊस, आणि आता पुन्हा तयार होत असलेल्या कमी दाबाचा पट्टा या सगळ्याचा परिणाम हवामानावर झाला आहे .अजूनही कमी दाबाचे पट्टे नव्याने तयार होणारे चक्रीवादळ याचा परिणाम म्हणून राज्यभर पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे .त्यामुळे हवेत आर्द्रता वाढली आहे .
हवामान तज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी दिलेलं माहितीनुसार, नोव्हेंबरच्या सुरुवातीला या दोन्ही कमी दाबांच्या क्षेत्राची तीव्रता कमी होईल. त्यानंतर राज्यात हवामान कोरडं होण्यास सुरुवात होईल.
पुढील 4 दिवस कुठे इशारे ?
26 ऑक्टोबर : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, धाराशिव, लातूर ,परभणी जालना छत्रपती संभाजीनगर,जळगाव व अकोला वाशिम अमरावती यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट .
27 ऑक्टोबर : मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर नागपूर गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात येलो अलर्ट. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
28 ऑक्टोबर : रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा बीड व संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट . उर्वरित सर्व जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता .
29 ऑक्टोबर : संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट .मराठवाड्यातील नांदेड तर तळ कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापुरात पावसाचा येलो अलर्ट .