पुणे : राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येत आहे. पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून भारताच्या सीमेजवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे तो केरळात कधीही दाखल होऊ शकतो. केरळसह तामिळनाडू राज्याला आगामी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सोमवारी राज्यातील बहुतांश भागात पावसाच्या सरी बरसल्या. आज (मंगळवारी) 20 मे रोजी राज्याला ऑरेंज अलर्ट तर कोकणला उद्या 21 मे रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यंदाच्या मान्सूनने अपेक्षेपेक्षा खूप वेगाने वाटचाल सुरू केली असून, 19 मे रोजी श्रीलंका ओलांडून अरबी समुद्रातून भारताच्या दिशेने प्रचंड वेगाने सरकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हवामान विभागाने केरळ आणि तामिळनाडूसह किनारपट्टीवरील राज्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 20 मे रोजी भारतीय किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मान्सून केरळमध्ये येत्या काही तासांतच दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने यापूर्वी 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. या वेगाने सरकत असलेल्या मान्सूनमुळे दक्षिण भारतासह संपूर्ण देशात हवामानात मोठा बदल होण्याची चिन्हं आहेत.

कोकणला उद्या (बुधवारी) रेड अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीला उद्या (बुधवारी) 21 मे रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हा पाऊस 22 मे पर्यंत राहणार असून 23 मे नंतर पावसाला ब्रेक लागण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मान्सूनच्या लवकर आगमनाची शक्यता; विक्रमाची नोंद होण्याची शक्यता

यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा लवकरच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, तो २१ किंवा २२ मे दरम्यान केरळमध्ये पोहोचेल, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मान्सून जर २० मेपूर्वी केरळमध्ये दाखल झाला, तर तो गेल्या शंभर वर्षांतील सर्वांत लवकर दाखल झालेला मान्सून ठरेल. याआधी मान्सून केरळमध्ये सर्वात लवकर २८ मे रोजी दाखल झाल्याची नोंद आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही हवामानात मोठे बदल जाणवू लागले आहेत. राज्यावर उच्च स्तरावरील चक्रीय वाऱ्यांचे परिसंचरण तयार झाले असून, त्यामुळे आर्द्रतेत वाढ होत आहे. याचा परिणाम म्हणून पुणे जिल्ह्यासह अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील ४ ते ५ दिवस तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषतः 21 ते 23 मे दरम्यान घाट भागात प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याकाळात कमी दृश्यमानता, ओले व घसरडे रस्ते, तात्पुरते पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, प्रशासनालाही योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

या जिल्ह्यांमध्ये पुढचे 48 तास यलो अलर्ट

पुणे, अहिल्यानगर सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशीव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.