Maharashtra Weather: गेल्या काही दिवसात राज्यातील गारठा चांगलाच वाढलाय. सरासरी किमान तापमान कमालीची घट झाली असून हाड गोठवणाऱ्या बोचऱ्या थंडीने नागरिक कुडकुडले आहेत. धुळ्यात शनिवारी राज्याचे नीचांकी तापमान ४.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान उत्तरेकडील थंड हवेच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीसह सकाळी धुक्याची चादर पसरण्याची शक्यता आहे. तापमान घटून पुन्हा काही अंशांनी वाढ होईल. विदर्भात तापमानात पुढील पाच दिवस कोणताही बदल नाही. 


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कमी दाबाचा पट्टा हा लक्षद्वीप आणि मालदीवला जोडून असणाऱ्या भागात आहे. चक्रकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपेक्षा 5.8 किमी असल्याने येत्या 24 तासात ही स्थिती पश्चिमेकडे सरकणार आहे. दुसरीकडे उत्तरेकडील राज्यांना थंडीच्या लाटायचा इशारा देण्यात आलाय. परिणामी महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी असल्याचं वर्तवण्यात आलाय. उत्तर भारतातून राज्यात शीतलहरी वेगाने येत आहेत, त्यामुळे राज्यातील बहुतांश भाग गारठू लागला आहे. शुक्रवारी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. हिमालयापासून ते मध्य भारतापर्यंतचा भाग थंडीने गारठला आहे. जम्मू, काश्मीर, लद्दाख, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशपर्यंतची राज्ये गारठली आहेत.


पुण्यात थंडीचा कडाका आणि धुक्याची चादर


राज्यात बहुतांश ठिकाणी आकाश निरभ्र असून तापमानात घट होत आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. पुणे शहरासह संपूर्ण जिल्हात गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे, शुक्रवारी शहराचे किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. आगामी पाच दिवस शहराच्या तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुणे, पिंपरी- चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यातील किमान तापमानात गेल्या 12 तासांत घट सुरू झाली असून, काही भागांतील पारा 11 अंशांवर खाली आला आहे. 


विदर्भ उत्तर महाराष्ट्र गारठला


उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान तापमान 9 ते 10 अंशांवर खाली आले होते. थंडीची लाट राज्यात सक्रिय झाली असून, 14 ते 18 डिसेंबर या कालावधीत ही लाट अधिक तीव्र राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह आता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही आगामी 12 ते 24 तासांत गारठा आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


हेही वाचा:


Maharashtra Weather Updates : राज्यात गारठा वाढला! जळगावमध्ये 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, जाणून घ्या कसं असणार हवामान