Maharashtra Weather Update:गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाला पोषक स्थिती होती. दरम्यान, अरबी समुद्रात वाढलेल्या आर्द्रतेमुळं राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. आता चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या उत्तर प्रदेश आणि परिसरात आहे. उत्तरेकडील राज्यात दाट धुकं आणि थंडीची लाट आहे. परिणामी राज्यात कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार आहेत. (Dry Weather) येत्या चार ते पाच दिवसात राज्यात पुन्हा किमान तापमानात घटणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 2-4 अंश सेल्सियसने तापमान घसरणार आहे. (IMD Forecast)


येत्या चोवीस तासांत विदर्भात 4-5 अंशाने हळूहळू घसरणार आहे. येत्या पाच दिवसात विदर्भात कमाल तापमानात फारसा परिणाम जाणवणार नाही. येत्या चार दिवसात राज्यात पुन्हा थंडी जाणवायला लागणार असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवलंय.


तापमानात काय बदल होणार?


हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात येत्या चार ते पाच दिवसात 1-2 अंशांनी वाढ होणार असून किमान तापमान 2-4 अंश सेल्सियसने कमी होणार आहे. विदर्भात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. तर किमान तापमानात येत्या 24 तासांत  4-5 अंशांनी घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.




नव्या वर्षाची सुरुवात कशी होणार?


हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, नव्या वर्षाची सुरुवात गुलाबी थंडीनं होणार असून राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ताज्या हवामान अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब हरियाणा भागात थंडीची लाट राहणार असून राज्यात कोरडे हवामान राहणार आहे.


किमान तापमान वाढले


राज्यात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाली असून याआधी 4-5 अंशांवर असणारा किमान तापमानाचा पारा 19-20 अंशांपर्यंत गेल्याच्या नोंदी झाल्या. मुंबईत तापमान20 अंशांच्याही पुढे गेले होते. तर सांगली, सातारा तसेच बहुतांश मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 17-19 अंशांवर जाऊन ठेपला होता.