Maharashtra Weather Update : मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत (Heat Wave) वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईचा पारा 39 अंशावर वर गेला आहे. हा पारा थोडा तरी कमी होईल अशी आशा प्रत्येकाला होती. मात्र अद्याप तरी पारा कमी झाल्याचं दिसत नाही. आजही मुंबईत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यासह विदर्भातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यात तुरळक आणि हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे.
16 मार्चपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज
राज्यातील अनेक भागात अवकाळीचा फटका बसण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. 16 मार्चपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 13 ते 16 मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भात 14 ते 16 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. कापणीला आलेल्या पिकांचा फटका बसण्याची शक्यता आहे, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पुन्हा गारपिटीसह पावसाचा अंदाज आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, नंदुरबारला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
आज मुंबई आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम
रविवारी (12 मार्च) मुंबईतील तापमान 38 अंशांवर गेले होते. हंगामातील आतापर्यंतचे सर्वोच्च कमाल तापमानाची नोंदवण्यात आले होते.
'या' भागात पावसाचा अंदाज
मागील काही दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. सध्या पश्चिमेकडून येणारं बाष्पयुक्त वारे, तसेच वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर प्रदेश, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे शहरात आणि ग्रामीण परिसरात पावसासाठी योग्य वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे शहरात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात जिल्ह्यात 13 ते 15 मार्च दरम्यान हवामान ढगाळ राहिल. तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :