13 March Headlines : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी तीन वाजता गिरगाव चौपाटी ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाणार आहे.  राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा तिसरा आठवडा आजपासून सुरू होत आहे.

  


राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा तिसरा आठवडा  


राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा तिसरा आठवडा आजपासून सुरू होत आहे.  गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर चर्चा सुरू होणार आहे. आज विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. आजपासून अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होणार आहे. यावेळी विरोधक आक्रमक होतील.  अवकळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालय. त्यांना मदत करावी, कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे.


 जुन्या पेन्शनसंदर्भात बैठक  


 जुन्या पेन्शन योजनेबाबत तोडगा न निघाल्यास 14 मार्चपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलाय. आरोग्य कर्मचारीही संपात सहभागी होणार आहेत. यावर आज मुख्य सचिवांनी बैठक बोलावली आहे. यात कर्मचारी, शिक्षक संघटनांचा सहभाग असणार आहे.  या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.


काँग्रेसचा राजभवनाला घेराव मोर्चा


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी तीन वाजता गिरगाव चौपाटी ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाणार आहे. या मोर्चात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, बस्वराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी, सर्व सेल व फ्रंटलचे अध्यक्ष तसेच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
 


समलौंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याच्या याचिकेवर सुनावणी


समलौंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. याला केंद्र सरकारने विरोध केला आहे.  


हसन मुश्रीफांना समन्स


राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना ईडीने आज चौकशीसाठी बोलवलं आहे. या प्रकरणात ईडीने अनेक ठिकाणी छापे मारी केली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 2021 साली आरोप केले होते.  
 


महसूल विभागातील सर्व नायब तहसीलदार आणि इतर राजपत्रित अधिकाऱ्यांची  सामूहिक रजा आंदोलन 


महसूल विभागातील नायब तहसीलदार या पदाला इतर विभागातील समकक्ष पदापेक्षा मिळणाऱ्या कमी वेतनासाठी आज महसूल विभागाचे सर्व नायब तहसीलदार आणि इतर राजपत्रित अधिकारी एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत. नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूरसह नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील अधिकारी एकत्रित येऊन आंदोलन करणार आहेत. 
 


लॉस एंजिल्स पुरस्कार सोहळा 


आज 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा होणार आहे. हा सोहळा भारतासाठी खास आहे. आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्यासह भारतीय डॉक्यूमेंट्री 'ऑल दॅट ब्रीथ्स' आणि 'द एलीफॅट व्हिस्परर्स' ऑस्कर पुरस्कासाठी शार्टलिस्ट करण्यात आलेत. भारतीय वेळेनुसार पहाटे 5.30 वाजता, हॉलीवूडच्या डॉल्बी थिएटर मध्ये सोहळा पार पडणार आहे.


अहमदनगरमध्ये बंद 


छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक मॅसेज प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांच्या निषेधार्ह आज पूर्णवेळ शेवगाव शहर बंद ठेवण्यात येणार आहे. शेवगाव शहरातील एका युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह स्टेट्स ठेवले होते, या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सकाळी 10 वाजता शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध नोंदवला जाणार आहे. यावेळी शहरातून मोर्चा काढला जाणार आहे.  


 भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याचा  शेवटचा दिवस  



 भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे. चौथ्या दिवसाअखेर भारताने 91 धावांची आघाडी मिळवली आहे. सामना सकाळी 9.30 वाजता खेळवला जाणार आहे.
 


हनुमान चालीसा पठण प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. यात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आरोपी आहेत. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणातून दोषमुक्तीसाठी राणांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होईल.