Maharashtra Weather Update : उत्तरेकडील राज्यात आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातही दिसून येतोय. महाराष्ट्रातील मिनी काश्मीर असे ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये थंडीचा पारा घसरला आहे. वेण्णा लेक परिसरात मंगळवारी मध्यरात्री शून्य अंश तापमानाची नोंद झालेली, तर सकाळी सहा वाजता वेण्णालेकवर एक अंश तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वरमध्ये पहिल्यांदाच शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तापमान शून्य अंशांवर आल्याने महाबळेश्वरात दवबिंदू गोठले होते. त्यामुळे महाबळेश्वरात काश्मीरसारखा आभास होत होता. पर्यटकही गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसले.
महाबळेश्वरचे तापमान (Temperature) मंगळवारी सकाळी 6 अंश सेल्सिअस तर दुपारी व सायंकाळी 9 अंश सेल्सिअस होते. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, वेण्णा तलाव येथे संध्याकाळी 6 वाजता तापमान 2.8 अंश सेल्सिअसच्या आसपास होते आणि ते 0 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. हाडं गोठवणारी थंडी असल्यानं अनेक ठिकाणी लोकांनी घरात राहण्यालाच पसंती दिलीय. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळही कमी झालीय. थंडीपासून बचावासाठी सामान्यांना विविध उपाय करावे लागताहेत. दुसरीकडे रब्बी पिकांना मात्र याचा फायदाच होतोय.
अवकाळी पाऊस आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे यंदा राज्यात गुलाबी थंडीचं जरा उशिराच आगमन झालं. पण आता ही थंडी 21 फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात कायम राहणार आहे. त्यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव पुढचे दोन महिने तुम्हाआम्हाला घेता येणार आहे. त्यात आज आणि उद्या तापमानाचा पारा आणखी घसरण्याचा अंदाज आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. 21 फेब्रुवारीपर्यंत राज्यातल्या अनेक शहरांचं तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात आधीच घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांचं तापमान तर आताच 8 ते 9 अंशांपर्यंत खाली आलं आहे. त्यामुळे नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. तर ऊबदार कपडेही कपाटाबाहेर काढून वापरात आलेत.
ग्रामीण भागात थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. महाबळेश्वरनंतर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या नंदुरबारच्या तोरणमाळ येथेही पारा घसरला आहे. बुधवारी येथील पारा सात अंशावर घसरला. इथला यशवंत तलाव आणि इतर परिसर ओस पडल्याचे चित्र गेल्या तीन दिवसांपासून पाहायला मिळतंय. विदर्भ वगळता राज्यात अनेक भागात कोरड्या हवामानाची स्थिती आहे. संपूर्ण राज्यात गुलाबी थंडी पसरल्याचे वातावरण झाले आहे. मुंबईसह कोकण विभागातील किमान तापमानात दोन दिवसांपासून मोठी घट झाली. नांदेड, वाशिम, सोलापूर, महाबळेश्वर येथे किमान तापमान सरासरीखाली आहे. मराठवाड्यात बहुतांश भागांत ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.
देशभरात थंडीची लाट -
देशभरात वातावरणात (Temperature Drop) गारवा पाहायला मिळतोय. पाऊस (Rain), बर्फवृष्टी(Snowfall) आणि थंडीची लाट(Cold Wave) यामुळे तापमानात सातत्याने घट होत आहे. उत्तर भारतात थंड वारे वाहत आहेत. अनेक डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि मैदानी भागात पाऊस यामुळे हवामानातील बदल दिसून येत आहे. परिणामी महाराष्ट्रात तापमानात कमालीची घट झाली आहे.
संबधित बातम्या :
Cold Weather : राज्यात हुडहुडी, महाबळेश्वरमध्ये शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद