Maharashtra weather update cold wave: महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत थंडीचा जोर चांगलाच वाढलाय. वाढत्या गारठ्याने नागरिकांना हुडहुडी भरताना दिसतेय.(Weather Update) राज्यातील अनेक भागांत किमान तापमानाचा पारा 7 ते 10 अंशांपर्यंत घसरलाय. उत्तरेतील राज्यांमध्ये थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत थंडी प्रचंड वाढणार आहे. 11 डिसेंबरदरम्यान किमान तापमानात मोठी घसरण होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (Cold wave)

Continues below advertisement

मुंबई- कोकणात तापमानात घसरण

10 डिसेंबरला मुंबई आणि उपनगरांत तापमानात लक्षणीय घट होणार आहे. पहाटे-संध्याकाळी थंडीची चाहूल अधिक जाणवेल. मुंबईत किमान तापमान सुमारे 15 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. कोकणातही अशाच परिस्थितीचा अंदाज देण्यात आला आहे.

Continues below advertisement

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट अधिक तीव्र होईल. पुण्यात 10 डिसेंबरला किमान तापमान 8 अंशांपर्यंत जाणार असून पुढील दोन दिवसांत ते 7 अंशांवर पोहोचू शकते. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी IMD ने ‘यलो अलर्ट’ जारी करत नागरिकांना उबदार कपड्यांची तयारी ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र गारठा

नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत तापमानात मोठी घसरण अपेक्षित आहे. नाशिकमध्ये पारा 7 अंशांपर्यंत तर जळगावात 6 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे. राज्यातील सर्वात थंड जिल्ह्यांपैकी एक ठरण्याची शक्यता जळगाववर आहे.

मराठवाड्यातही गारठा कायम; चार जिल्ह्यांना अलर्ट

मराठवाड्यात सकाळच्या गारठ्यासोबत दुपारच्या कडक उन्हाचा अनुभव कायम राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांसाठी 10 डिसेंबरला ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

विदर्भात थंडीची लाट किंचित ओसरली

विदर्भात यवतमाळ, गोंदिया आणि नागपूरमध्ये थंडीचा जोर जाणवला असला तरी 10 डिसेंबरला थंडीची लाट दिसणार नाही. नागपूरमध्ये किमान तापमान 9 अंश तर अमरावतीत 11 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

11 डिसेंबरपर्यंत थंडीचा इशारा कायम असल्याने प्रशासनाने विशेषतः ज्येष्ठ नागरिक, बालकं आणि आजारी व्यक्तींनी उबदार कपड्यांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. पहाटे आणि उशिरा रात्री बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यभर तापमानात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे थंडीचा फटका सर्वत्र जाणवू लागला आहे.