Maharashtra Weather Update: राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांत बदल जाणवत असून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाच्या सरींनी हजेरी लावली. उत्तरेकडील भागात शीत प्रवाह आणि दक्षिणेकडे ढगाळ वातावरणामुळे महाराष्ट्रात हवामान बदलले आहे. किमान तापमानात वाढ झाली आहे. पुन्हा एकदा थंडीची लाट येण्याच्या चर्चा सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आगामी काही दिवसांत किमान तापमान तुलनेने जास्त राहणार असून कडाक्याच्या थंडीची शक्यता नसली तरी पहाटे आणि रात्री गारठा जाणवणार असल्याचा अंदाज आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. या ढगाळ हवामानाचा परिणाम किमान तापमानावर झाला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या राज्यातील बहुतांश भागांत किमान तापमान 12 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे.
कोकणात निरभ्र, मुंबईत सौम्य थंडी
4 जानेवारी रोजी कोकणात हवामान मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. सकाळी आणि रात्री थोडीशी गार हवा जाणवेल.
पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी
पश्चिम महाराष्ट्रात हिवाळ्याची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. पुण्यात कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळेत धुक्याचं प्रमाण कायम असून वाहनचालकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. सोलापूरमध्ये राज्यातील उच्चांकी कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे.
मराठवाडा, विदर्भातही हवामान कसे?
मराठवाड्यात मुख्यतः कोरडे वातावरण राहणार असून आकाश निरभ्र राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान 15 अंश आणि कमाल 29 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील नाशिक, नागपूरसारख्या शहरांतही अशीच हवामानस्थिती राहणार आहे.
आरोग्याची काळजी घ्या - IMD चा सल्ला
तापमानात वाढ झाली असली तरी अचानक हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी पहाटे आणि रात्री गरम कपडे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.