Maharashtra weather : हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यातील बुलढाणा, नाशिक, सोलापूर, नागपूर, बीड, नांदेड, अमरावती, सांगली, जालना या जिल्ह्यात वादळी पाऊस झाला आहे. या पावसामुळं काही ठिकाणी नागरीक जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.


बुलढाणा जिल्ह्यात वादळी पावसामुळं घरांचं नुकसान 


गुरुवारी (21 एप्रिल) सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं अनेकांच्या घराचं नुकसान झालं आहे. संग्रामपूर येथील अनेक नागरिकांच्या घरावरील छपरे प्रचंड हवेमुळं उडाली आहेत. अनेकांची संसार उघड्यावर पडले आहेत. या परिसरात तीन तास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला.


उदयनगर परिसरात गारपीट, शेती पिकांचं मोठं नुकसान 


चिखली तालुक्यातील उदयनगर या गाव शिवारात प्रचंड गारपीट झाली आहे. तसेच दुपारपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. मात्र सायंकाळच्या सुमारास प्रचंड गारपीट झाली. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा, मका आणि फळबागाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. सकाळी उन्हाचा पारा वाढला होता आता हवेत गारवा निर्माण झाला आहे. या वातावरणातील बदलामुळं मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे.


नांदेडमध्ये वादळी पाऊस


नांदेडमध्ये रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर कडक उन्हाचा सामना केल्यानंतर रात्री नांदेडकरांना हवामान बदलाचा सुखद धक्का बसला. या वादळी वाऱ्याने नांदेडमध्ये घरांचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्याने आंबा, संत्रा, मोसंबी अशा फळबागांचं नुकसान झालं आहे.


जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस


जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये आज पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील आलापूर, पळसखेडा, मालखेडा यासह इतर भागात
वादळी वारे आणि गारांचा पाऊस झाला. या पावसानं मका, कांदा, बाजरी यासह या भागातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील तुरळक पाऊस झाला आहे. दरम्यान, गारांच्या पावसानं शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जाव लागतय.


नागपूरमध्ये एकाचा मृत्यू


वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नागपूरच्या गोंडवाना चौक बहिरामजी टॉवर परिसरात भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक महिलेसह लहान मुलगाही जखमी झाला आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. 


बीडमध्ये विजेची तार तुटल्यानं पाच दुकानांना, लाखोंचं नुकसान


बीडमध्ये वादळी वाऱ्यामुळं विजेची तार तुटल्यानं पाच दुकानांना आग लागून लाखो रुपयांच नुकसान झालं आहे. शहरातील चांदणी चौक परिसरामध्ये असलेल्या एका ऑटोमोबाईल्सच्या दुकानावर विजेची तार तुटून पडल्याने ही आग लागली होती. यामध्ये ऑटोमोबाईलच्या दुकानासह ट्रान्सपोर्टच्या कंपनीच्या गोदामाच देखील प्रचंड नुकसान झाल आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Weather : दिवसा उन्हाचा कडाका रात्री अवकाळीचा तडाखा; वाचा पुढील पाच दिवसातील हवामानाचा अंदाज