Maharashtra weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climet Change) होत आहे. कुठे उन्हाचा तडाखा तर कुठं ढगाळ वातावरण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच हवामान विभागानं पुढील 4 ते 5 दिवसाचा हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 4 ते 5 दिवस राज्यात तीव्र हवामानाचा इशारा कायम आहे. राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असंआवाहन करण्यात आलं आहे. 

मुंबई ठाणे पालघर येथे मुसळधार पावसाची शक्यता

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कताही भागात गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई ठाणे पालघर येथे मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 

धुळ्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली

धुळे शहरासह परिसरात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. एकीकडे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तयारीला वेग दिलेला असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहेत या अवकाळी पावसामुळे हरभरा मका गहू या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. तसेच यंदा शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर देखील लागवड केली होती. मात्र या अवकाळी पावसामुळे हा कांदा सडून जाण्याची देखील भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून यामुळे वातावरणात एकीकडे बदल झालेला असला तरी दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

पालघरमध्ये वादळी वारा आणि पावसाचा मच्छीमारांना फटका

दरम्यान, पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला वादळी वारा आणि पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळी वारा आणि पावसाचा मच्छीमारांना देखील फटका बसला आहे. डहाणू आणि पालघरमधील चाळीस ते पंचेचाळीस बोटींच मोठं  नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. वादळाच्या तडाख्यात 40 ते 45 बोटी सापडल्या होत्या, त्यांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे सुरु करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.  

महत्वाच्या बातम्या:

सावधान! पुढील 4 तास महत्वाचे, या भागात वीज वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाचा इशारा