मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार मान्सूनपूर्व पावसाचा (Pre-Monsoon) इशारा दिला असताना ठिकठिकाणी मान्सूनची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह (Mumbai) राज्यात (Maharashtra) काही ठिकाणी पावसाची (Rain) हजेरी पाहायला मिळत आहे. मान्सून पूर्व पावसाने डोंबिवलीत (Dombivli) हजेरी लावली आहे. कल्याण (Kalyan), डोंबिवली परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते, त्यानंतर दुपारपासून  डोंबिवलीत रिमझिम पाऊस सुरू झाला आहे.


कोकणात मान्सून पूर्व पाऊस सुरु


रायगडमध्येही मतमोजणीपूर्वीच पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. अलिबागमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यात काही भागात तुफान पाऊस सुरु आहे. अलिबाग परिसरात अचानक सुरु झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. 7 जून अगोदरच महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात तीन दिवस पावसाचा अंदाज असल्यामुळे लोकसभा मतदान निकालावर पावसाचं सावट आहे. 


अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ


सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार मान्सून पूर्व पाऊस सुरु झाला आहे. कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार मान्सून पूर्व पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हवामान विभागाने सिंधुदुर्गात आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 


हिंगोलीत पावसाला सुरुवात


हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, हिंगोली, औंढा नागनाथ, या तालुक्यांमध्ये रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी प्रचंड उन्हामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते, परंतु या पावसाने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अशाच पद्धतीने मान्सूनला वेळेवर सुरुवात झाल्यास शेतातील पेरण्या लवकर होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.


बारामतीत मान्सून पूर्व पावसाची हजेरी


बारामती शहरात रविवारी संध्याकाळी सहा वाजता पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली. गेली दोन दिवसात बारामती परिसरात कमालीचा उकाडा जाणवत होता त्यातच आज सहा वाजता अचानक पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. बारामती शहरात पाणी कपात केल्याने नागरिक आणि शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. पावसानं बरसाव अशीच प्रार्थना बळीराजा करीत आहे.