मुंबई : अखेर मुंबईकरांची मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून मुंबईत धडकला आहे. राज्यातही अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईत मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. पुढील 24 तासात मुंबई, ठाणेसह राज्यात पावसाचा अंदाज असल्याने घराबाहेर पडण्याआधी छत्री, रेनकोट घेऊनच घराबाहेर पडा. जून महिन्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जुले महिन्यात प्रशांत महासागरात ला निना परिस्थिती निर्माण होईल. याच्या प्रभावामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदारा पाऊस पडेल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.


पुढील 24 तासांत रिमझिम पावसाच्या सरी 


राज्यात पुढील 24 तासात अनेक ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी पाहायला मिळेल. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा पाहायला मिळेल, त्याशिवाय हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


मुंबईत हवामान कसं असेल?


मुंबईत काल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गेल्या 24 तासांत मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील 24 तासांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळ आणि रात्रीच्या सुमारास ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसेच ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान 35°C आणि किमान तापमान 28°C च्या आसपास राहील, असा आयएमडीचा अंदाज आहे.






राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी


दक्षिण कोकण, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात आज तर, उद्या कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी पाहायला मिळेल. गेल्या 24 तासांत मान्सून मुंबईत दाखल झाला असून हळूहळू तो महाराष्ट्र व्यापणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून मुंबईत दाखल, हवामान विभागाची घोषणा