Maharashtra Weather in June Month : मान्सून (Monsoon) हळूहळू राज्याच्या विविध भागत सक्रिय होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 6 जूनला मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर आज मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. पुढच्या चार पाच दिवसात मान्सून महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्व भाग व्यापून टाकणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. दरम्यान, जून महिन्यात नेमकं कसं असेल हवामान? नेमका कुठं पडेल पाऊस याबाबतची सविस्तर माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी दिलीय.


9 ते 14 जून दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा


पंजाबराव डखांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 9 ते 14 जून दरम्यान सातारा, सांगली तसेच पुणे, कोकण, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये  मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईतील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. याशिवाय या कालावधीत धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, बीड आणि परभणी या भागात देखील मुसळधार पावसाची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे. साधारणपणे आज पासून ते 14 जून पर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे. सध्या मान्सून कोकण आणि मुंबईत दाखल झाला आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 


आज कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट


आज कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तसेच सिंदुधुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीव नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.  


पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत


सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काल विशेषत: पुणे जिल्ह्यात वादळी पावसानं हजेरी लावली. यामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायाला मिळालं. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पामीच पाणी साचलं होतं. त्यामुळ वाहतुकीला मोठी अडचणी निर्माण होती. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुण्यात 117 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अदाजानुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून मुंबईत दाखल, हवामान विभागाची घोषणा