मुंबई : राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी (Monsoon) पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यात सलग तीन ते चार दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबईत दाखल झालेला मान्सून येत्या काही दिवसात महाराष्ट्र व्यापणार आहे. यादरम्यान, काही भागात मान्सूनपूर्व तर काही भागात मान्सूनच्या पावसानं झोडपून काढलं आहे. गेल्या दोन ते तीन दिवस सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही जिल्ह्यात शेती आणि फळबागांचंही नुकसान झालं आहे.
रस्त्यावर भला मोठा खड्डा
राज्यात अनेक ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना घडल्या आहे. सोलापूर शहरात सतत सुरु असलेल्या पावसामुळे रस्ता खचला आहे. शहरातील निराळे वस्ती ते अरविंद धामकडे जाणारा रस्ता सततच्या पावसामुळे खचला आहे. रस्त्यावर ड्रेनेजलाईनचे काम सुरु होते, त्यात मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला आहे.
संततधार पावसामुळे रस्ता खचला
परभणीच्या मानवत तालुक्यातील मंगरूळ ते रामपुरी रस्ता खचला आहे. परभणीत काल पाथरी आणि मानवत तालुक्याला पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढलं होतं. परभणी जिल्ह्यातील या 2 तालुक्यात मुसळधार पाऊस झाला होता. यामुळे अनेक ओढ्या-नाल्यांना पाणी आले होते. यातूनच मानवत तालुक्यातील मंगरूळ ते रामपुरी हा रस्ता पूर्णतः खचला असून यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे.
पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास
बीडच्या माजलगांव तालुक्यातील कोथाळा येथील सरस्वती नदी उसंडून वाहू लागल्याने गावातील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने नदीला पूर आला आहे. बीडच्या माजलगांव तालुक्यातील कोथाळा येथील सरस्वती नदी तोडून वाहू लागल्याने गावातील नागरिकांना जीवघेणा प्रवास सुरू केला आहे. सरस्वती नदीवरील पूल लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.