SSC HSC Exam Result : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दहावी (SSC Exam) आणि बारावी (HSC Exam) परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर होणार की नाही याबाबत साशंकता असतानाच विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यंदा दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेतच जाहीर होणार आहे. बारावी बोर्डाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.


संपानंतर उत्तरपत्रिका तपासणीचं काम जलद गतीने सुरु


दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी शिक्षक, शिक्षकेतर संघटनांनी पुकारलेल्या संपानंतर जलद गतीने सुरु असून या उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत पूर्ण होणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. दहावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीची डेडलाईन 15 एप्रिलची असणार आहे. तर त्याआधी बारावी बोर्ड पेपर तपासणीचे काम जवळपास काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर निकाल तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल.


जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सात दिवस पुकारलेल्या संपामुळे दहावी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र संप मागे घेतल्यानंतर शिक्षकांनी हे काम प्राधान्याने हाती घेतल्याने दहावी बारावी बोर्ड परीक्षा निकाल वेळेत जाहीर होणार आहे.


15 लाख, 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला पात्र


राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या काळात घेण्यात आली. यंदा राज्यभरातील 15  लाख, 77 हजार 256 विद्यार्थी या परीक्षेला पात्र ठरले. राज्यातील 533 केंद्रांवर परीक्षा पार पडली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावी परीक्षार्थींच्या संख्येत 61 हजार 708 इतकी घट झाली.


14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा 


राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण राज्यातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. राज्यभरात 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा पार पडली.


यंदा अनेक नियमांमध्ये बदल


दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अनेक नियम यंदा बदलण्यात आले होते. यासोबतच कॉपी मुक्त परीक्षा आयोजित करण्यासाठी काही कठोर नियमही जाहीर करण्यात आले होते. उमेदवाराने परीक्षेचा पेपर चोरल्यास, मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर घेतला, विकत घेतला किंवा पाठवला तर परीक्षा रद्द केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला होता. तसंच पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्याचं निलंबन केली जाईल, असंही बोर्डाकरुन सांगण्यात आलं होतं.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI