मुंबई : राज्यात (Maharashtra Weather) एकीकडे काही भागात मान्सूनपूर्व पाऊस (Monsoon) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेने (Heatwave) हैराण केलं आहे. राज्यात विदर्भ मराठवाड्यात तापमानात प्रचंड वाढ झाली असून उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच विदर्भात 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज नागपूरमध्ये 45.6 अंश सेल्सिअस एवढ्या प्रचंड तापमानाची नोंद झाली.
या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट
नागपुरात 45.6 अंश या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर वेध शाळेने विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ,, वाशीम अकोला, अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील काही दिवस तापमान आणखी वाढणार असल्याने गरज नसताना दुपारच्या वेळेस घराबाहेर पडू नये, अशा इशारा वेधशाळेने नागरिकांना दिला आहे. या संदर्भात नागपूर वेधशाळेचा उप महानिदेशक एम एल शाहू यांनी ही माहिती दिली आहे.
विदर्भात उन्हाच्या झळा
यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच विदर्भात 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज ब्रह्मपुरीमध्ये 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नागपूरमध्ये 45.6 अंश सेल्सिअस एवढ्या प्रचंड तापमानाची नोंद झाली. 45.6 अंश हे नागपुरातील या मोसमातील उच्चांकी तापमान आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये आज कमाल तापमान जास्त नोंदवलं गेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे आज 47.1 अंश तापमानाची नोंद झाली, तर चंद्रपुरात आज 44.8 अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे. ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर या दोन्ही शहरात आज मौसमातील सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं आहे.
मराठवाड्यातही पारा चांगलाच वाढला
राज्यात सर्वत्र उन्हाचा पारा चढत असला तरी विदर्भ खानदेश नंतर आता मराठवाड्यातही पारा चांगलाच वाढला आहे. नांदेडच्या मांडवी गावात आज उच्चांक तापमानाची नोंद झाली आहे. आज मांडवी गावात आज तापमान 46 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहचलं आहे. कुलर, पंखे आणि एसीने शिवाय जगणं कठीण झाल्याचं चित्र आज मांडवी गावात पाहायला मिळालं. वाढत्या तापमानामुळे मात्र नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसत होते.
पुढील पाच दिवसात तापमानात आणखी वाढ होणार
सूर्यानं 25 मेपासून रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला असून विदर्भात नव तपाला सुरुवात झाली आहे. नव तपाच्या पहिल्याच तीन दिवसात विदर्भात विक्रमी तापमानाची नोंद झाली असून पारा 45 आणि 46 अंशांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे नव तपाचे पुढील सात दिवस विदर्भवासियांसाठी आणखी कठीण जाणार आहेत. हवामान विभागाने ही 29 मे पर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे विदर्भातील जनतेने उष्माघातापासून बचाव करण्याची खास गरज आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :