Maharashtra Weather Update: गेल्या दोन महिन्यांपासून तुफान हजेरी लावलेला नैऋत्य मान्सून आता परतीच्या प्रवासावर आहे .हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार (IMD Forecast) पुढील 24 तासांत देशभरातून पाऊस माघारी फिरण्यासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे . गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट होते . काल (15 ऑक्टोबर ) मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने तुफान हजेरी लावली .आजही IMD ने महाराष्ट्रात कोकण मध्य व उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे . पुढील दोन-तीन दिवसात पावसाचा जोर कमी होणार असून त्यानंतर तापमानात काहीशी वाढ होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय .
हवामान खात्याचा नेमका अंदाज काय ?
राष्ट्रीय मोसमी विज्ञान विभाग आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार, देशभरातून नैऋत्य मौसमी पाऊस परतण्यासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे . येत्या 24 तासात देशभरातून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे .याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुढील दोन दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे .कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आज IMD ने वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिलाय . आज एकूण 13 जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे .
कोणत्या जिल्ह्यात पावसाचे अलर्ट ?
16 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, नाशिक, नगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे .मुंबई, ठाणे, पालघर, तळ कोकणासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर व मराठवाड्यातील हिंगोली परभणी व नांदेड या जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता आहे .
17 ऑक्टोबर : पालघर व नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट . मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे .
मराठवाडा कोकणात पावसाची जोरदार हजेरी
बुधवारी, महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला .विशेषतः मराठवाडा कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली .मराठवाड्यात दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली . बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होते .बीड जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस आल्याने वातावरणात बदल झाला आहे . मध्य महाराष्ट्रातही सांगली सातारा कोल्हापूर तसेच पुण्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली . 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात ठीक ठिकाणी पावसाची शक्यता असून 20 ऑक्टोबर पर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे . ऐन दिवाळीत पावसाची शक्यता आणि बदलत्या हवामानाने नागरिकांचा हिरमोड होऊ शकतो .