Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्यात आला असलं, तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अजूनही खल सुरूच आहे. दोन्हीकडेही सर्वच पक्षांनी जागांवर दावा केल्याने तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे अजूनही दोन-तीन दिवस महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपाच्या चर्चेमध्ये जातील असं बोललं जात आहे. 


महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागांचा वाद कायम 


दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीकडून जवळपास 240 जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी आघाडीकडून 220 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जागावाटप पूर्ण होण्याची शक्यता आहे. महायुतीकडे अजूनही 48 जागांवरती खल सुरूच आहे, तर महाविकास आघाडीकडून अजूनही 68 जागांवर पेच कायम आहे. त्यामुळे 20 तारखेपर्यंत या जागा निश्चित करून जागावाटप जाहीर केलं जाईल, अशी माहिती समोर येत आहे. 


जागावाटपावरून अमित शाहांकडून त्यागाची आठवण! 


एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपावरून चांगलंच घमसान सुरू असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून समोर आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केल्याचा आठवण करून देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागावाटपामध्ये थोडी संयमी भूमिका घेण्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा जागावाटप करताना शिंदे यांनी त्याग करावा, भाजप मोठा पक्ष असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जागावाटप हा महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये सुद्धा कळीचा मुद्दा झाला आहे. त्यामुळे जागा वाटप होणार तरी कधी याकडे लक्ष लागून राहिलं आहे.


दरम्यान, महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला आणि झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषदेत 14 राज्यांतील 48 विधानसभा आणि 2 लोकसभेच्या पोटनिवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या.


केरळमधील वायनाडमध्ये १३ नोव्हेंबरला आणि महाराष्ट्रातील नांदेडमध्ये 20 नोव्हेंबरला लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. त्याचवेळी 13 नोव्हेंबरला 47 विधानसभा जागांवर आणि 20 नोव्हेंबरला उत्तराखंडच्या केदारनाथ विधानसभेच्या जागेवर मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला सर्व निकाल लागतील.


इतर महत्वाच्या बातम्या