Raju Shetti : परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जागांवर उमेदवार देणार असल्याचे  माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. पुढील दोन दिवसांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार देणार असल्याचेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. माझ्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि चळवळ सर्वांत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संघटनेच्या हिताचा निर्णय माझा असेल असे ते म्हणाले. तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय काही जणांना आवडला नसल्याचे भासवलं जात आहे. मात्र, त्यामध्ये तथ्य नसल्याचे ते म्हणाले. प्रदीर्घ चर्चा करून तिसऱ्या आघाडी सोबत जाण्याचा निर्णय झाल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला. ते म्हणाले की दुसऱ्या आघाडी सोबत जाण्याचा निर्णय बदलण्यासाठी कार्यकारिणीची बैठक घ्यावी लागेल. मात्र, त्यासाठी आता वेळ नसल्याचे ते म्हणाले. 


संभाजीराजे यांच्या भूमिका सर्वच आम्हाला मान्य असतील असे नाही


दरम्यान, परिवर्तन महाशक्तीमध्य किमान समान कार्यक्रमावर आम्ही एकत्र आलो असल्याचे शेट्टी म्हणाले. संभाजीराजे यांच्या भूमिका सर्वच आम्हाला मान्य असतील असे नाही. मात्र आम्ही चळवळीतील माणसं आहोत. प्रामाणिकपणे सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करणारी माणसे आहोत. सद्याचं संधी साधू आणि लुच्चेगिरीचं राजकारण पाहता आम्ही आमचे थोडे विचार बाजूला ठेवून सर्वसामान्यांसाठी एकत्र आलो असल्याचे ते म्हणाले. 


सगळ्यात यशस्वी ऊस परिषद असेल 


दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या (25 ऑक्टोबर) होणारी ऊस परिषद सर्वात यशस्वी ऊस परिषद असेल, असा राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. उद्या कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 23 वी ऊस परिषद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. शेट्टी म्हणाले की, गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला अजून किमान दोनशे रुपये दर मिळाला पाहिजेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील भूमिकेवरून नाराजी पसरल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सावकार मादनाईक हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिट्टी देणार असल्याची चर्चा आहे. त्यांना शिंदे गटाकडून निमंत्रण देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना शेट्टी यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, सावकार मादनाईक यांच्याबाबत काही जणांना वाटतं. मात्र, तसं काही सुद्धा होणार नाही. उद्या होणाऱ्या ऊस परिषदेला ते उपस्थित असतील. त्यांची काही अडचण नसल्याचे ते म्हणाले.


महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये फारसा फरक नाही


महायुती आणि महाविकास आघाडीला राजू शेट्टी यांनी टोला लगावला. ते म्हणाले की महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये फारसा फरक नाही. राज्यातील सर्वच पक्षांमध्ये फुटाफूट झाली असून त्याला कोणीही अपवाद नाही. महाविकास आणि महाविकास आघाडी महायुतीमध्ये भांडण गाईच्या कासेत बसून दूध कोणी काढायचं यासाठीच असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आताचं राजकारण पाहून या राजकारणात का पडलो याचा पश्चाताप होतो. मात्र सर्वसामान्य नागरिकांचा आवाज सभागृहात पोहोचवायचा असल्यास त्या घाणीत पडावे लागेल यासाठी आम्ही सामील झालो असून त्या पद्धतीने काम करत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान, पक्ष फुटीचे दुःख शरद पवारांना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणीस यांना देखील जास्त असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या