Nagpur News नागपूर : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी संपली असून आता  विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) वारे सध्या वाहू लागले आहेत. अशातच आगामी विधानसभेची (Maharashtra Assembly Election 2024) अद्याप घोषणा झालेली नसली तरी, पुढील विधानसभेसाठी सर्व पक्षांनी आपली कंबर कसली असून राजकीयदृष्ट्या सर्वांगाने जुळवाजुळव सुरू केली आहे. अशातच नागपूर (Nagpur News) शहरातील सहा हि विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने (Congress) दावा केलाय.  या मतदारसंघात निवडणूक पूर्व तयारीलाही सुरवात झाल्याचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी सांगितले. त्यामुळे राज्याची उपराजधानी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शहरात काँग्रेसने जोरदार मोर्चे बांधणी केल्याचे चित्र आहे.


देवेंद्र फडणवीसांविरोधात लढवण्यासाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची चढाओढ


नागपूर शहरातील सहा हि विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंत 71 इच्छुक उमेदवारांनी शहर काँग्रेसकडे उमेदवारी मिळावी, यासाठी अर्ज केले आहे. यात सर्वाधिक अर्ज हे मध्य नागपूर विधानसभेसाठी 30 अर्ज आले असल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्यासाठी देखील काँग्रेस मध्ये इच्छुकांची मोठी यादी असल्याचे ही  विकास ठाकरे म्हणाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपक्षाने उसंत घेत घवघवीत यश मिळवले होते. तर राज्यासह विदर्भात  काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस मोठ्या मताधिक्याने सर्वच्या सर्व जागांवर विजय संपादन करेल, असा विश्वासही आमदार विकास ठाकरे यांनी बोलताना व्यक्त केलाय.


भाजप विधानसभेला 150 पेक्षा जास्त जागा लढवण्याची शक्यता


दुसरीकडे आगामी  विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपनेही जोरदार तयारी केल्याचे समजतंय. महाराष्ट्रात भाजपाने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात, असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभानिहाय मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते  त्याचप्रमाणे सर्वेक्षण अहवाल याच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या ती जागा त्याच पक्षाकडे राहील. मात्र काही मोजक्या जागा आहेत त्यामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. 


जिंकून येण्याची खात्री असलेला उमेदवार महायुतीतील कोणत्या पक्षाकडे आहे याबाबत लोकसभा निकाल व सर्वेक्षण अहवाल याचा आधार घेतला जाईल. आगामी विधानसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागा निश्चितीचा अधिकार कोअर कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.  कोअर कमिटीच्या बैठकीत जागा वाटप आणि विधान सभेची रणनीती यावर चर्चा झाल्याचे समजते.