Maharashtra Unlock : राज्यात कोरोनाची संख्या कमी होत असल्याचं दिसताच आता राज्य सरकारकडून (Maharashtra Govt)अनलॉकची प्रक्रिया सुरु केली जात आहे. राज्य सरकारकडून आता शाळा, मंदिरं आणि नाट्यगृहं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे, असं ट्वीट मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने करण्यात आलं आहे. 


या दरम्यान, कोविड सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. दरम्यान राज्य सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला याचे भाजप अध्यात्मिक आघाडी, साधू, महंतकडून स्वागत केले जात आहे, महाराष्ट्रातील साधू संतांनी केलेला शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी पडला, आम्ही सरकारला वठणीवर आल्यानंतर मंदिर उघडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी दिली.


Religious places Reopen | शाळांनंतर आता धार्मिक स्थळंही उघडणार?


राज्यातील विद्यामंदिरंही उघडणार..
राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी परवानगी दिली आहे. शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे शाळा सुरु (Schools Reopening) करण्यास परवानगी मागितली होती. त्यामुळे पुढील महिन्यात शाळेची घंटा वाजणार आहे. त्यानुसार आता ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्याअगोदर शिक्षक आणि पालकांना प्रशिक्षण देणार असल्याचंही गायकवाड यांनी सांगितलं आहे.



शाळा, मंदिरांपाठोपाठ नाट्यगृहही सुरु करण्याच्या तयारीत
शाळा, मंदिरांपाठोपाठ नाट्यगृहही सुरु करण्याच्या तयारीत सरकार आहे. जागतिक मराठी रंगभूमी दिनी नाट्यगृह सुरु होणार आहेत. यामुळं नाट्यकलाकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 5 नोव्हेंबरला जागतिक मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. अनलॉकनंतर अनेक कलाकारांची नाट्यगृह सुरु करण्याची मागणी केली होती.