Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज रत्नागिरीत (Ratnagiri) सभा होणार आहे. ही सभा रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या खेडमध्ये (Khed) होणार आहे. सायंकाळी पाच वाजता ही जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, या सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.


राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदमांचा आज पक्षप्रवेश 


खेडच्या गोळीबार मैदानात आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. सायंकाळी पाचता ही जाहीर सभा होणार आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचाही जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांचे निकटवर्तीय माजी बांधकाम सभापती विश्वासकाका कदम हे देखील पक्षात प्रवेश करणार आहेत. या सभेत उद्धव ठाकरे कोणाचा समाचार घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, खेडमधील गोळीबार मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी भव्य असं व्यासपीठ उभारण्यात येत आहे. लाख ते सव्वालाख लोक जमतील इतकी मैदानाची क्षमता आहे. या व्यासपीठावर शिवसेनेचे सर्व नेते, आजी-माजी आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.


 निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गट आक्रमक 


मुख्यमंत्री शिंदे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं आहे. त्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. त्यामुळं त्यांच्या या सभेकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. राज्यातील राजकीय वातावरण देखील तापलं आहे.  


आज मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची आशिर्वाद यात्रा


दरम्यान, दुसरीकडे आज मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची आशिर्वाद यात्रा निघणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार व दोन्ही पक्षांचे नेते त्यात सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यावर जनजागृती करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप-शिवसेनेकडून सहाही लोकसभा मतदारसंघांत दुचाकी फेरीच्या माध्यमातून आशीर्वाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानापासून आशीर्वाद यात्रेची सायंकाळी पाच वाजता सुरुवात होणार आहे आणि रात्री नऊ वाजता मुंबादेवी येथे समारोप होणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन पाप केलं नाही, माझ्याच लोकांनी मला धोका दिला - उद्धव ठाकरे