मुंबई राज्यात टोलचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. टोल माफीच्या (Toll Free)  या मुद्यावरून आता एसटी बसेसना (ST Buses)  टोल माफी देण्याची मागणी केली जात आहे. एसटी महामंडळाच्या (MSRCT ST Bus) बसेसना टोल माफी दिल्यास आर्थिक तुटीतून बाहेर येण्यास मोठा हातभार लागेल असे महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्यात टोलच्या मुद्यावरून बैठक झाली. मात्र, या बैठकीत एसटीकडून होत असलेल्या टोल वसुलीबाबत साधी चर्चादेखील न होणे ही दुर्देवी असल्याचेही त्यांनी म्हटले. 


एसटी  महामंडळाच्या साधारण 14 हजार ते 14,500  गाड्या प्रत्यक्ष  रस्त्यावर धावत आहेत. त्यातून दररोज 52 लाख प्रवासी आणि दररोज साधारण 60 ते 70  हजार फेऱ्या होत आहेत. रस्तावर प्रत्यक्ष धावणाऱ्या प्रत्येक गाडी मागे एसटीला टोल भरावा लागत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला दरवर्षी सरासरी 162 ते 167 कोटी रुपये इतका टोल भरावा लागत असल्याकडे श्रीरंग बरगे यांनी लक्ष वेधले. 


विविध कारणांमुळे महामंडळाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एसटीचा संचित तोटा 9000 कोटी रुपयांच्या घरात आहे. पुरवठादारांची आजही 850 कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत. अशातच ज्येष्ठ नागरीक महिलांना शासनाने दिलेल्या प्रवासातील सवलतीमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या, व्यवस्थापनाच्या अथक प्रयत्नांमुळे महामंडळ नफ्याच्या जवळ पोहोचले आहे. आता मासिक तोटा कमी झाला असून मासिक तूट फक्त 24 कोटी रुपये इतकी खाली आली आहे. एसटीला टोल मधून मुक्ती दिल्यास महामंडळ नफ्याच्या एकदम जवळ पोहचू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.  त्यामुळे साहजिकच राज्यातील गरीब प्रवासी जनतेला अजून चांगल्या सवलती देता येतील आणि दिलासा मिळू शकेल. या शिवाय महामंडळा समोरील आर्थिक अडचणी सुद्धा दूर होऊ शकतील. त्यामुळे पुढील बैठकीत सरकारने एसटी बसला लागणाऱ्या टोल वसुली बाबतीत सुद्धा फेर विचार करून टोल मधून एसटीला  पूर्णतः मुक्ती द्यावी अशी मागणीही बरगे यांनी केली आहे. 


एसटी महामंडळ किती ठिकाणी टोल भरते?


एसटी महामंडळाने गेल्या काही वर्षात जवळपास 1900 कोटी रुपयांचा टोल हा शासनाला दिला आहे. साधारण एका वर्षाला 160  ते 170 कोटी रुपये टोल एसटी महामंडळाला भरावा लागत आहे. त्यात सध्या महाराष्ट्राचे रस्ते विकास महामंडळाचे 5 टोल सुरू आहेत.  मेगा हायवेला दोन टोलनाके असून राष्ट्रीय महामंडळ प्राधिकरणाचे 56 टोलनाके आहेत. अशा एकूण 63 जुन्या टोल नाक्यांवर एसटीला टोल भरावा लागतो. 2015 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे 27 आणि महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाचे 26 असे एकूण 53 टोल नाकेबंद झाले.  इतर 12 टोल काही कारणास्तव बंद झाले. असे एकूण 65 टोल नाके बंद झाले आहेत. हा हजारो कोटी रुपयांचा टोल शासनाने जर महामंडळाला माफ केला असता तर एसटी महामंडळाची वाईट परिस्थिती नसती असा दावा  एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.