Maharashtra Temperature: महाराष्ट्रात सर्वदूर थडीची लाट पसरलीय. उकाड्याचं शहर अशी ओळख असलेल्या मुंबईनेही यंदा कूस बदलत थंडीची गुलाबी चादर पांघलीय. तर तिकडे देवभूमी कोकणही बोचऱ्या थंडीने गारठून गेलंय. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही थंडीमुळे शेकोट्या पेटल्या आहेत. अनेक भागांतील शेता-वावरात, डोंगरदऱ्यांतील झाडा-झुडुपांवर दवबिंदूंचे मोती चमकताना दिसतायत. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या रोडावली असली तरी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून थंड हवेत ऊब घेतली जातीय. कोनाड्यात पडलेले स्वेटर, कानटोप्या आता बाहेर आल्या असून कच्चा-बच्चांपासून ते वयस्कर मंडळीही ऊबदार कपडे घालून वावरताना दिसतायत.मुंबईचा शेजार लाभलेल्या पालघर, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबईलाही चांगलीच हुडहुडी भरलीय. भर थंडीत दात थडथडवत वाफाळत्या चहाचा, तर कुठे गरमागरम भजी आणि मिसळीवरही ताव मारले जातायत. सूर्य डोक्यावर येऊन सूर्याची किरणं अंगावर येईपर्यंत असं चित्र दिसून येतंय. तर अनेक भागांत तळहात चोळत कोवळ्या उन्हाची किरणं अंगावर घेतली जातायत. त्यातच ऐन संक्रांतीच्या दिवशी वातावरणाने थंडीची भेट दिल्याने तीळगुळाचा गोडवाही लज्जतदार वाटू लागलाय.

महाराष्ट्रात आज कुठे किती तापमान?

ठाणे - 17.2 पुणे - 10.7सातारा - 12.7नांदेड -14.5कोल्हापूर- 16औरंगाबाद - 8.8 उदगीर - 14.5रत्नागिरी 15.8सोलापूर -15.6जळगाव - 7.8 परभणी - 13.5मालेगाव - 12डहाणू - 13.1नाशिक - 8.4 उस्मनाबाद 11.1बारामती - 11.8माथेरान - 13.6सांगली - 14.9जालना - 16

कोकणात दोन दिवसात हुडहुडी आणखी वाढणार.. गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान हळूहळू कमी होऊन थंडीचे प्रमाण वाढले होते.आता या गारठ्यात पुढील दोन दिवस अजून वाढ होणार आहे आणि यामुळे हुडहुडी भरणारी थंडी निर्माण होणार आहे अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलली आहे.थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे थंडीचा जोर वाढला आहे.. 

माथेरान येथे गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा गारवा झाला आहे. आज सकाळी १३.६  अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झावी आहे. माथेरान येथे शनिवारी ११.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 

सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमान चार अंश सेल्सिअसच्या खाली, दवबिंदू गोठलेनंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगामधील वालंबा, डाब आणि तोरणमाळ परिसरात तापमानात मोठी घट झाल्याने थेट दवबिंदु गोठल्याचा प्रकार समोर आला आहे. दवबिंदु गोठल्याने गवतांवर बर्फाची चादर पसरल्याचे चित्र दिसुन आले.  गेल्या काही वर्षापासून या भागात तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने अशा पद्धतीने दवबिंदु गोठुन बर्फाची चादर होत असल्याचे चित्र वारंवार दिसून आले आहे. मात्र या भागात हवामान विभागाचे कुठलेही तापमान मापक यंत्र नसल्याने नेमक तापमान किती याबाबत नोंदच होत नाही. अशातच कडाक्याच्या थंडीने सातपुडा पर्वत रांगामध्ये सकाळी उशीरापर्यत शेकोट्या पेटत असल्याचे चित्र आहे. गेल्या 48 तासात नंदुरबार मधल्या सपाटी भागतच तापमानात 8 अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली. अशातच सातपुड्याच्या पर्वत रागांमध्ये सपाटीभागापेक्षा तापमान चार ते पाच अंशानी कमी असते.

नाशिकमध्येही हुडहुडी -

नाशिकसह जिल्ह्यातील थंडीचा पारा दिवसेंदिवस घसरत आहे. आज पुन्हा नाशिकच्या तापमानात घट होऊन पारा घसरला आहे. तर नाशिक कॅलिफोर्नियात आज सहा अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज नाशिक शहरात  8.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर निफाडमध्ये आज 6.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.