मुंबई : विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा म्हणजेच वाढीव रक्कम मिळावी या मागणीसाठी शिक्षक आक्रमक झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून शिक्षकांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं आहे. मंगळवारी शिक्षक त्यांच्या मागण्यासाठी अधिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला पोलिसांनी आंदोलन स्थळाचा माईक आणि लाईट बंद केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार हे शिक्षकांसह रात्रभर आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. तर हे आंदोलन मिटलं नाही तर बुधवारी (9 जुलै) शरद पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत.
आपल्या विविध मागण्यासाठी 5 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानात शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षाकडून समर्थन दिलं जात आहे. यावर जर तोडगा निघाला नाही तर शरद पवार हे बुधवारी आंदोलकांची भेट घेणार आहेत.
फडणवीसांविरोधात सुप्रियाताईंची घोषणाबाजी
दरम्यान आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. शिक्षकांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याची मागणी त्यांनी केली. तर माझा भाऊ अर्थमंत्री असला तरी सगळे निर्णय फडणवीस घेतात असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांविरोधात घोषणाबाजी केली.
रोहित पवार रात्रभर उपस्थित राहणार
दरम्यान, शिक्षकांच्या या आंदोलनाला रोहित पवार यांनी पाठिंबा दिला आहे. शिक्षकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "मी शिक्षकांचा, युवकांचा, शेतकऱ्यांचा विषय घेऊन पुण्यापासून नागपूरपर्यंत चाललो. तरी सुद्धा सरकार जागं होत नाही. आता जोपर्यंत एखादा मंत्री इथं येत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत असणार. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उठायचं नाही. तुमच्या मागे आम्ही सर्वजण आहोत."
नेमकं काय आहे प्रकरण?
राज्यातील सुमारे 5,000 खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 मधील अधिवेशनात घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर 10 महिने उलटूनही अद्याप निधीची कोणतीही तरतूद सरकारने केली नाही, त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर 8 व 9 जुलै रोजी राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यामध्ये सध्या 5,844 अंशतः अनुदानित खासगी शाळा आहेत. यामध्ये 820 प्राथमिक, 1,984 माध्यमिक व 3,040 उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण 3,513 प्राथमिक, 2,380 माध्यमिक व 3,043 उच्च माध्यमिक तुकड्या कार्यरत आहेत. एकूण 8,602 प्राथमिक शिक्षक, 24,028 माध्यमिक शिक्षक आणि 16,932 उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या शाळांमध्ये कार्यरत आहेत.
ही बातमी वाचा: