पुणे : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आणि समिती या दोन शिक्षक संघटनांचं अधिवेशन कोकणात सुरू आहे. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान हे अधिवेशन चालणार आहे. 18 तारखेला महाशिवरात्री आणि 19 तारखेला रविवार असल्याने विद्यार्थांना सलग 5 दिवस सुट्टी असणार आहे. परंतु हे अधिवेशन घेताना राज्यातील बहुतांश शाळा बंद करून अधिवेशनाचा घाट घाटण्यात आलाय. महाराष्ट्र राज्यात मराठी माध्यमाच्या 65000 शाळा आहेत. त्यामध्ये सुमारे अडीच लाख शिक्षक त्यापैकी सव्वा ते दीड लाख शिक्षक रायगड येथे जाणार आहेत अशी माहिती आहे. त्यामुळे शाळांना टाळं ठोकण्याची वेळ आली आहे. 


ज्या मैदानात सकाळी विद्यार्थ्यांचा किलबिलाट असतो, त्याच मैदानात आज शांतता आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आणि समिती या दोन शिक्षक संघटनांचा अधिवेशन सुरू आहे. शिक्षक नसल्याने शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. बारामती तालुक्यातील 278 पैकी फक्त 62 शाळा सुरू आहेत. तर 216 शाळांना कुलूप लावण्यात आलं आहे. शाळा बंद ठेऊन अधिवेशन घेतले जाते. हेच अधिवेशन दिवाळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात घ्यायला पाहिजे होत असे मत पालकांनी व्यक्त केलं आहे.


बारामती तालुक्यात एकूण 768 प्राथमिक शिक्षक आहेत. त्यातील 660 शिक्षक हे अधिवेशनासाठी गेलेले आहेत. तर नऊ शिक्षक हे किरकोळ रजेवरती आहेत. त्यामुळे 278 शाळांमधील फक्त 99 शिक्षक हे सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे बारामती तालुक्यातील 278 पैकी 62 शाळा सुरू आहेत. तर पुरंदर तालुक्यातील 218 पैकी फक्त 45 शाळा सुरू आहेत. सलग पाच दिवस शाळा बंद असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांच्यात नाराजी आहे.


अधिवेशनाला जाण्यासाठी शिक्षकांना रजा मंजूर करावी असा आदेश शासनाने काढला होता. त्यानुसार ही रजा मंजूर करण्यात आली आहे. शिक्षक आणि पदवीधर विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला फटका बसला आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी जाणाऱ्या शिक्षकांना रजा मंजूर करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. तर उर्वरित शिक्षकांनी शाळा सुरू ठेवावी असेही सांगितले आहे. अधिवेशन घेण्याला कुणाचा विरोध नसावा, परंतु शाळा बंद करून अधिवेशन घेणं योग्य आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 


रायगडमध्ये आज पासून होत असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाच्या अधिवेशनासाठी राज्यातील प्राथमिक शाळेचे बहुतांश शिक्षक रजेवर गेलेत. त्यामुळे कामावर असणाऱ्या शिक्षकांना अध्यापन करण्यासाठी चांगलेच तारेवरची कसरत करावी लागत आहे. कांही ठिकाणी शाळा बंद आहेत. 


उस्मानाबाद तालुक्यातील खानापूरच्या जिल्हा परिषद शाळेत एकूण पाच शिक्षकांची नेमणूक आहे. त्यांच्यापैकी चार महिला शिक्षिका अधिवेशनासाठी रजेवर असल्याने शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अरुण कांबळे यांच्यावर पहिली ते सातवीचे वर्ग सांभाळण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती राज्यात अनेक जिल्ह्यांत दिसून येतेय.


महाराष्ट्र राज्यात मराठी माध्यमाच्या 65000 शाळा आहेत. त्यामध्ये सुमारे अडीच लाख शिक्षक त्यापैकी सव्वा ते दीड लाख शिक्षक रायगड येथे जाणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 1150 शाळा आहेत. त्यामध्ये पाच हजार शिक्षक आहेत. त्यापैकी 4500 शिक्षक अधिवेशनाला जाणार आहेत. त्यामुळे 1500 शिक्षकांवर शाळा चालणार आहे.