मुंबई : तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटीचा (Talathi Exam 2023) आरोप असलेला मुख्य आरोपी गणेश गुसिंगे हा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत पास झाल्याचं दिसून येतंय. या भरतीच्या परीक्षेमध्ये गणेश गुसिंगेला 138 गुण प्राप्त झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचं दिसून येतंय. या सर्व प्रकारानंतर आता या परीक्षांच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय.
नाशिकमध्ये तलाठी भरतीचा पेपर फोडणाऱ्या गणेश गुसींगेला वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेच्या जाहीर झालेल्या यादीत 138 गुण मिळाल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्याची निवड होऊ शकते. गणेश गुसिंगे हाच पिंपरी चिंचवड पोलिस भरती आणि म्हाडाच्या पेपरफुटीमध्येही आरोपी आहे.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने काल DMER परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, ई.सी.जी. तंत्रज्ञ, आहारतज्ञ ,औषधनिर्माता अशा विविध 5182 पदांसाठी ही भरती परीक्षा होती. या परीक्षेत याआधी म्हाडा, पिंपरी चिंचवड पोलीस भरती आणि तलाठी भरती परीक्षेत आरोपी असलेल्या गणेश गुसिंगेला 200 पैकी 138 गुण मिळाले. त्यामुळे या परीक्षेतसुद्धा या उमेदवाराने गैरप्रकार केला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या उमेदवाराकडून या DMER परीक्षेत सुद्धा गैरप्रकार करण्यात आल्याचं स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला संशय आहे. टीसीएस, डीएमईआर आणि राज्य सरकारने अशा संशयित उमेदवारांची पूर्ण चौकशी करून निवड करावी अशी विनंती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे.
तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी नाशकात अटक करण्यात आलेला आरोपी गणेश गुसिंगे हा म्हाडा आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यात फरार होता. त्याच्याविरोधात म्हाडा परीक्षा भरतीमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी खेरवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. तर पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2019 मध्ये गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर याच गुसिंगेवर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांसाठी हा फरार आरोपी असताना एवढे दिवस या आरोपीला अटक करण्यास कसे लागले? असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार आणि हायटेक कॉपी करण्यामध्ये एक टोळीच कार्यरत असल्याचा संशय समितीला असून यामध्ये गणेश घुसिंगे आणि त्याचे साथीदार यामध्ये सामील असल्याचा आरोप संघटनेकडून केला जातो आहे.
ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव गणेश गुसिंगे असून तो मूळचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याच्याकडून एक टॅब, एक वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन आणि हेडफोन असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेचे फोटोही मिळून येताच म्हसरूळ पोलीस ठाण्यात गणेश गुसिंगेसह, सचिन नायमाने आणि संगीता गुसिंगे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गणेशला अटक करण्यात आली आहे तर इतर दोघे फरार आहेत. संगीता ही गणेशची बहीण असून ती परीक्षा केंद्रात पेपर देत होती तर त्यांचा तिसरा साथीदार सचिन हा या दोघांना मदत करत होता अशी चर्चा आहे.
ही बातमी वाचा: