पुणे :  चांद्रयान - ३ या यशस्वी मोहिमेचा देशभरात (Chandrayan-3) जल्लोष सुरू आहे. या यशामध्ये खडकवासला मतदारसंघातील खेड शिवापूर येथील VCB Electronics Company चा मौल्यवान वाटा आहे. या कंपनी मध्ये चांद्रयान-3 साठी लागणारे सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवण्यात आली आणि इस्रो सर्टिफाईड सर्व उपकरणे असून त्याचा पुरवठा VCB Electronics Company  कंपनी कडून चांद्रयान-3 साठी करण्यात आला होता. 


याठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची असलेली संख्या मोठी आहे. आज तंत्रज्ञानाच्या काळात स्त्रिया कोणत्याही बाबतीत मागे नाहीत, याची प्रचिती या कर्तृत्ववान महिलांच्या उपस्थितीत येते. खासदार सुप्रिया सुळे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकनकर यांनी चांद्रयान-3 यशस्वी लँडींग झाल्यानंतर VCB Electronics Company ला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या कंपनीतील सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून मोहिमेसाठी केलेल्या कामाची माहिती देखील घेतली. सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या कंपनीचं अभिनंदन केलं आहे.


यावेळी VCB Electronics Company चे डायरेक्टर भानुदास भोसले, जनरल मॅनेजर चेतन भोसले, पर्चेस मॅनेजर अभिजित पायगुडे, अकाउंट मॅनेजर रेश्मा कारले, एच. आर. मॅनेजर प्रमिला कोंडे, खडकवासला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सौ.सुनीता डांगे, पुणे शहर कार्याध्यक्ष गौरी जाधव, पुणे शहर कार्याध्यक्ष पूनम पाटील, खडकवासला विधानसभा सरचिटणीस डिंपल इंगळे, पुणे शहर सरचिटणीस सुलक्षणा भोसले, स्मिता कोंडे उपस्थित होते.






पुण्याच्या क्विक हिलचाही मोलाचा वाटा


इस्रोची चांद्रयान 3 (chandrayan-3) मोहीम यशस्वी झाली. चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरणारा भारत हा जगात पहिला देश ठरला. शेकडो लोकांची मेहनत आणि जिद्दीमुळे भारतानं हे शक्य करुन दाखवलं. मात्र मोहिमेत पुण्यातील क्विकहील टेक्नॉलॉजी आणि सेक्यूराईट यांचा मोलाचा वाटा होता. क्विकहील (Quick Heal) टेक्नॉलॉजी यांच्या सेक्युराईट या कंपनीचा सायबर सुरक्षा (Cyber Security) भागीदार म्हणून इस्रोच्या ऐतिहासिक चांद्रयान-3 मोहिमेत मोलाचा वाटा होता. क्विकहील (Quick Heal) आणि  त्यांचा SEQRITE एंटरप्राइझ विभाग यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सोबत दीर्घकाळ भागीदारी आहे. भारतातील अनेक मोठ्या सरकारी संस्थांसाठी कंपनीने त्यांच्या सर्वसमावेशक सुरक्षा उपायांद्वारे  महत्त्वपूर्ण डिजिटल पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.