Dharashiv: पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात लाजिरवाणा प्रकार समोर आलाय . लिंबू, बांगड्या , कुंकू , बाहुली , दाबन यासारख्या वस्तू अशा वस्तू गावच्या शिवावर ,शाळेच्या बाहेर निर्मनुष्य जागेत टाकून दहशत माजवण्याचा प्रकार समोर आल्याने गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे . मराठवाड्यातील जालन्यात शाळेत बाहुली कुंकू टाकल्याची घटना ताजी असतानाच धाराशिव जिल्ह्यातही असाच एक प्रकार समोर आलाय . खेड आणि उपळा गावच्या शिवावर लिंबू, बांगड्या ,बाहुली दाबन ठेवत हिरव्या कपड्यात गुंडाळलेली गळ्यात मंगळसूत्र असलेली गव्हाच्या पिठातली मूर्ती आढळली .हा करणी भानामतीचा प्रकार आहे असं म्हणत गावकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण तयार झालंय. रात्रीच्या वेळी रस्त्याने प्रवास करायलाही लोक घाबरत आहेत .याच परिसरात पाच-सहा वेळेस असा प्रकार समोर आला असून नेमका काय प्रकार आहे याचा तपास करावा अशी मागणी गावकरी करतायत .

खेड आणि उपळा गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार वारंवार घडत आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाच ते सहा वेळेस या भागात अशा वस्तू आढळल्या आहेत. निर्मनुष्य व निर्जन ठिकाणी अशा प्रकारच्या वस्तू टाकल्या जात असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनांमुळे अंधश्रद्धेची दहशत वाढत असून नागरिक रात्रीच्या वेळी या भागातून प्रवास करण्यासही घाबरत आहेत.

नेमका काय प्रकार आहे तपासा, गावकऱ्यांची मागणी

जालन्यात याआधी शाळेच्या परिसरात बाहुली व कुंकू टाकण्यात आल्याने अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला होता. आता धाराशिव जिल्ह्यातील खेड व उपळा येथे अशाच स्वरूपाच्या घटना घडल्याने नागरिक अस्वस्थ झाले आहेत. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, या प्रकारामुळे लहान मुले व महिलांमध्ये विशेषत: भीती पसरली असून रात्री-अपरात्री घराबाहेर पडण्यास लोक धजावत नाहीत. गावकरी या घटनांना गंभीरतेने घेत असून संबंधित भागात नेमका हा प्रकार कोण करत आहे, त्याचा शोध घेण्याची मागणी करत आहेत. या घटनांच्या मुळाशी कोण आहेत, तसेच करणी-भानामतीच्या या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पोलिसांनी व स्थानिक प्रशासनाने या संदर्भात तातडीने तपास करून नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे अंधश्रद्धेच्या समस्या पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. ग्रामीण भागात अजूनही करणी, भानामतीसारख्या अंधश्रद्धा पसरवल्या जात असून अशा घटनांमुळे लोकांमध्ये घबराट निर्माण केली जात असून पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात पुन्हा अंधश्रद्धेचं जाळ पसरताना दिसतंय.

हेही वाचा:

थरकाप! तरुणांचा दिवसाढवळ्या वकिलावर चाकूहल्ला, हाणामारी, तुफान राडा CCTV कॅमेऱ्यात कैद