Marathi Language Elite Status : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मगणीसाठी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत राज्याच्या शिष्टमंडळाने दिल्लीतील परिवहन भवन येथे आज सांस्कृतिक मंत्री किसन रेड्डी यांची भेट घेतली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मंत्री सुभाष देसाई यांनी माहिती दिली आहे. 


"मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची मागणी आहे. त्यासाठीच आज सकाळी शिष्टमंडळासह आम्ही सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेतली. 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. या दिवसानिमित्त दरवर्षी राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. साहित्यिकांना पुरस्कार दिले जातात. या वर्षीही अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचं आमंत्रण सांस्कृतिक मंत्र्यांना दिले आहे. या कार्यक्रमाच्या मंचावरूनच 27 फेब्रुवारी रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्र्यांनी करावी, अशी विनंती सांस्कृतिक मंत्र्यांना केल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली.    


अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचे मराठीने सर्व निकष पूर्ण केले आहेत. त्यामुळे मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल. याबाबत संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सांस्कृतिक मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले होते. याबरोबरच आजच्या बैठकीतही सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा विश्वास मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 






पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सकारात्मक आहेत, अशी माहिती सांस्कृतीक मंत्र्यांनी दिल्याचे सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.  


दरम्यान, मराठी भाषेला "अभिजात" भाषेचा दर्जा मिळावा या मागणीची चार हजार पोस्ट कार्ड काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींना रवाना करण्यात आली आहेत. 


मराठी भाषेला "अभिजात" दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक जन अभियान सुरू करण्यात आले आहे. हा "अभिजात" दर्जा 27 फेब्रुवारी 2022 रोजी मराठी भाषा गौरव दिवस आहे, त्याआधी मिळावा, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काल  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चार हजार पोस्ट कार्ड राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आली आहेत. हा पोस्ट कार्ड पाठविण्याचा दुसरा संच आहे. याआधी सुद्धा एक संच राष्ट्रपतींना पाठविण्यात आला आहे.


महत्वाच्या बातम्या