मुंबई : सध्याच्या कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात सध्या अस्थिर वातावरण आहे. प्रशासनासमोर आरोग्य व्यवस्था हे प्रथम प्राधान्य आहे. म्हणूनच दरवर्षी एप्रिल-मे दरम्यान शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्या बदल्या केल्या जातात. मात्र 2020 साली या बदल्या ऑगस्ट 2020 पर्यंत स्थगित करण्यात आल्या होत्या. आता 2021 या वर्षासाठीही या बदल्या 30 जूनपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 


केवळ ‘या’ कारणांसाठी होणार बदली! 
या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांवर भरती करणे, कोरोना रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवांसाठी पदभरती करणे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार आल्यास बदली करण्याची गरज असल्यास बदली करावी, असे सरकारच्या शासन निर्णयात म्हटले आहे. या व्यतिरिक्त अन्य कारणांसाठी बदली करण्यात येणार नाही.


राज्यातील कोरोनासंबंधी स्थितीचा आढावा घेऊन निर्णय! 
राज्यात कोरोनाचे संकट असल्याने अनेक उद्योग व्यवसायांना फटका बसला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला असून, राज्य सरकारने राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता या कोरोनाचा फटका शासकीय बदल्यांना देखील बसल्याचे पहायला मिळत आहे. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या आता 30 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने तसा शासन निर्णय काढला आहे. राज्यातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेवूनच त्यासंबंधी पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असेही या शासन निर्णयात म्हटले आहे.