Ganeshutsav 2022 : राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी 29 ऑगस्ट रोजी (सोमवारी) पगार /निवृत्ती वेतन मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याचा पगार पुढील महिन्यात एक सप्टेंबर रोजी होतो, हा पगार आता ऑगस्ट महिन्यातच 29 तारखेला होणार आहे. राज्य सरकारनं याबाबतचं परिपत्रक (जीआर) काढलं आहे.  


यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवात 31 ऑगस्ट 2022 पासून होत आहे. महिनाअखेर असल्यामुळे गणेशउत्सव साजरा करताना राज्य कर्मचाऱ्यांना अर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच राज्य सरकारने ऑगस्ट महिन्याचा पगार तीन दिवस आधी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा पगार 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. यासाठी राज्य सरकारने जीआर काढला आहे.  दरम्यान, ऑगस्ट महिन्याचा पगार लवकर करण्यासाठी राज्य सरकारनं मुंबई वित्तीय नियम, 1959 मधील नियम 71 च्या तरतुदी तसेच कोषगार नियम 1968 च्या खंड 1 मधील नियम क्रमांक 328 मधील तरतुदी शिथिल केल्या आहेत. 


राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी अथवा कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांनाही हा नियम लागू होणार आहे. या सर्वांचा पगार अथवा निवृत्तीवेतन 29 ऑगस्ट रोजीच मिळणार आहे. राज्य सरकारकडून याबाबतच्या सर्व सूचना संबधित विभागांना दिल्या आहेत. 


यंदा निर्बंधाशिवाय गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार
दोन वर्षानंतर कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर यंदा गणेशोत्सव निर्बंधांशिवाय साजरा होणार आहे. यावर्षी गणेश मूर्तीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नसेल. तसेच गणेश मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्या म्हणून एक खिडकी योजना राबवली जाणार आहे. गणेशोत्सव मंडळांना कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. तसंच हमीपत्र देखील न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मूर्तीकारांसाठी असलेल्या काही जाचक अटी व शर्ती शिथील कराव्यात. पीओपीच्या मूर्तींबाबत एक तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार असून, त्यामध्ये एमपीसीबी, निरी, आयआयटी, एनसीएल आदी संस्थांचे तज्ज्ञ प्रतिनिधी असतील. ही समिती पर्यावरणपूरक मार्ग काढेल. गणेशोत्सवासाठी राज्यभर एक नियमावली राहिल.


आणखी वाचा : 
Ganeshotsav 2022 : महाराष्ट्रातली सर्वात उंच गणेशमूर्ती 'मुंबईच्या महाराजा'ची, परशुराम रुपी मूर्तीची उंची तब्बल...
Pune Ganeshotsav 2022: अखेर वादात सापडलेल्या 'अफजल खानाचा वध' या देखाव्याला पोलिसांची परवानगी; मंडळाच्या प्रयत्नांना यश