मुंबई :   राज्याच्या मंत्रिमंडळात आज 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांचा समावेश असून या नव्या मंत्र्यांना मंत्रिपदं देण्याबरोबरच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शिक्षण विभागाचे दोन भाग करून उच्च शिक्षण विनोद तावडे यांच्याकडे तर शालेय शिक्षण आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आले आहे. सोबतच शेलार यांच्याकडे तावडेंकडील क्रीडा खाते देखील देण्यात आले आहे. शेलार यांना गृहनिर्माण खाते मिळेल अशी चर्चा असताना गृहनिर्माणची जबाबदारी नुकतेच भाजपवासी झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. तर अनिल बोंडे यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे कृषी खाते आले आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. जयकुमार रावल यांच्याकडून रोजगार हमी खाते काढून घेत अन्न व औषध प्रशासन आणि राजशिष्टाचार विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर डॉ संजय कुटे यांच्याकडे कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडील कामगार खातं काढून त्यांच्याकडे  अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रा. तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात केलेल्या शिवजलक्रांतीच्या कामाचे फळ त्यांना मिळाले असून त्यांच्याकडे जलसंधारण खाते देण्यात आले आहे. तर राजकुमार बडोले यांच्याकडील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रीपदाची जबाबदारी सुरेश खाडे यांच्यावर सोपवली आहे. विष्णू सवरा यांना डच्चू दिल्यानंतर आदिवासी विकास विभागाची धुरा अशोक उईके यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर सुभाष देशमुख यांच्याकडील पणन व वस्त्रोद्योग खातं काढून राम शिंदे यांना देण्यात आले आहे. असे झाले खातेवाटप कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील - गृहनिर्माण जयदत्त क्षीरसागर - रोजगार हमी आणि फलोत्पादन आशिष शेलार - शालेय शिक्षण आणि क्रीडा व युवक कल्याण संजय कुटे - कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण सुरेश खाडे- सामाजिक न्याय अनिल बोंडे - कृषी अशोक उईके - आदिवासी विकास तानाजी सावंत - जलसंधारण राम शिंदे - पणन व वस्त्रोद्योग संभाजी पाटील निलंगेकर - अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण जयकुमार रावल - अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार सुभाष देशमुख - सहकार, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री योगेश सागर- नगरविकास अविनाश महातेकर - सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य संजय भेगडे- कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन परिणय  फुके - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), वने आणि आदिवासी विकास अतुल सावे - उद्योग आणि खणीकर्म, अल्पसंख्याक विकास व वक्फ