मुंबई : राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली असली तरी त्यामध्ये अजून चार टक्के वाढ करावी, एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी 11 सप्टेंबरपासून बेमुदत  उपोषणावर (ST Worker Protest) जाणार आहेत. येत्या 11 तारखेपासून मुंबईतील आझाद मैदानावर हे उपोषण करण्यात येणार असून त्याची प्रशासनाने दखल घेतली नाही तर 13 सप्टेंबरपासून राज्यभर उपोषण करण्याचा इशाराही महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. 


राज्य सरकारने नुकताच एक जीआर काढून एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. पण शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 42 टक्के असून एसटी कर्मचाऱ्यांनाही 42 टक्के महागाई भत्ता मिळावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केली आहे. तसेच कामगारांच्या मूळ वेतनामध्ये वाढ करावी आणि एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने 11 सप्टेंबरपासून उपोषण करण्यात येणार आहे. 


राज्य सरकारने या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 13 सप्टेंबरपासून राज्यातील सर्व जिल्हास्तरावर हे आंदोलन (ST Worker Protest) करण्यात येणार असल्याचं परिपत्रक महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीनं काढण्यात आलं आहे. 


एसटी कर्मचाऱ्यांचा भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला


राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा एसटी महामंडळातील 90 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते.  त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. 


शासनाच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता दिला आहे. त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनासुद्धा मिळायला हवा होता, पण तो अद्याप मिळालेला नाही.  राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता मिळत असून त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता मिळायला हवा होता. पण एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप 34 टक्के इतकाच महागाई भत्ता मिळत असल्याचेही कर्मचारी संघटनांनी म्हटले. 


ही बातमी वाचा: