मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लालपरी ठप्प होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषणाचा (Hunger Strike) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना दुपारी 12 वाजता चर्चेसाठी बोलावलं आहे. एसटी कामगारांचे आर्थिक आणि महत्त्वाचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. म्हणूनच एसटी कामगार संघटनेकडून मुंबईच्या आझाद मैदानात (Azad Maidan) बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, उदय सामंत यांच्याशी होणाऱ्या चर्चेतून मार्ग न निघाल्यास 13 सप्टेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत उपोषणाचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे. महागाई भत्ता 42 टक्के करावा, महामंडळाला अर्थसहाय्य करावे, कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशा कामगार संघटनेच्या मागण्या आहेत.


राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी 2021 मध्ये 54 दिवस संप केला होता. राज्य सरकारने मेस्मा लागू केला होता. अखेर हा संप मिटल्यानंतर कर्मचारी पुन्हा कामावर आले. परंतु ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कामगार संघटना आजपासून आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. जाणून घेऊया एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या...


महाराष्ट्र कामगार एसटी संघटनेच्या प्रमुख मागण्या



  • शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 42 टक्के महागाई भत्ता थकबाकीसह द्या

  • सन 2018 पासूनची महागाई भत्याची थकबाकी द्या.

  • माहे एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 ची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी द्या.

  • माहे एप्रिल 2016 ते सप्टेंबर 2021 पर्यंतची घरभाडे भत्त्याची थकबाकी द्या

  • मूळ वेतनात जाहीर केलेल्या रु.5000, रु.4000 आणि रु.2500 रुपयांमुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावती दूर करा 

  • राप कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांएवढे वेतन मिळण्यासाठी 10 वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करा. 

  • सन 2016-2020 च्या एकतर्फी जाहीर केलेल्या रु.4849/- कोटींमधील शिल्लक रक्कम त्वरीत द्या.

  • गणवेशाचे कापड वाढीव शिलाई भत्त्यासह द्या.

  • शिस्त आणि अपील कार्यपद्धतीचा भंग करुन देण्यात येणाऱ्या नियम बाह्य शिक्षा रद्द करा.

  • अपहार प्रवण बदल्या रद्द करा.

  • सण अग्रीम रु. 12500/- मूळ वेतनाची अट न लावता द्या

  • आयुर्मान संपलेल्या बसेस चालनातून काढून टाका आणि स्वमालकीच्या लालपरी घ्या

  • चालक-वाहक वेळापत्रकातील त्रुटी दूर करा.

  • 10 ते 12 वर्षांपासून TTS वर असलेल्या कर्मचाऱ्यांना TS वर घ्या.

  • सेवा निवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दुर करा

  • कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना सर्वप्रकारच्या एसटी बसेसमध्ये फरक न भरता मोफत पास सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये द्या

  • सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पती-पत्नीसह एक वर्षाचा फरक न भरता मोफत पास सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये द्यावा

  • सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमा तात्काळ द्या.


VIDEO : ST Worker Protest: प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगारांची बेमुदत उपोषणाची हाक