मुंबई: पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक (SSC HSC Exam Time Table) जाहीर करण्यात आलं असून दहावीची परीक्षा ही 1 मार्च रोजी होणार आहे तर बारावीची 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. बोर्डाने हे जाहीर केलेलं www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर 28 ऑगस्ट पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने (Maharashtra Board) पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या संभाव्य परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यामध्ये बारावी बोर्ड परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 पर्यंत होणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा ही 1 मार्च ते 22 मार्च 2024 पर्यंत होणार आहे.
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने, विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2024 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल असं महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलं आहे. त्या अंतिम छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी असं आवाहनही करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे राज्य मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल. या संभाव्य वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असंसुद्धा बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
दहावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
दरम्यान, दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 29.86 टक्के लागला आहे. निकालात 51.47 टक्क्यांसह लातूर विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.
ही बातमी वाचा: